( रत्नागिरी /प्रतिनिधी )
थिबाराजा काळातील ऐतिहासिक व पवित्र अशा बौद्धविहाराच्या जागेवर कम्युनिटी सेंटर उभारण्याच्या प्रशासनाच्या हालचालींना विरोध करण्यासाठी तालुक्यातील विविध बौद्ध संघटना एकत्र आल्या असून, ‘थिबाराजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती’ची स्थापना करण्यात आली आहे. हा लढा अधिक व्यापक व संघटित करण्यासाठी १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, रत्नागिरी येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा अधीक्षक शासकीय बंगल्याच्या शेजारी थिबाराजा कालीन बौद्धविहार परिसरात बौद्ध बांधवांकडून जयंती सोहळे व धार्मिक उपक्रमांद्वारे त्या स्थळाची जपणूक केली जात आहे. या ठिकाणी भविष्यात भव्य बुद्धविहार उभारण्याचा समाजाचा दृढ विश्वास आणि आशावाद होता. मात्र, “थिबाराजा कालीन बुद्धविहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट”ने त्या जागेवर बौद्धविहाराऐवजी कम्युनिटी सेंटर उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी बौद्धविहारासाठी राखीव १७.५० गुंठ्यांच्या जागेवरील आरक्षण रद्द केले. या निर्णयाला तीव्र विरोध करत समाजातील विविध संघटनांनी न्यायालयात धाव घेतली आणि कम्युनिटी सेंटरच्या कामाला स्थगिती मिळवली. यानंतर बौद्धजन पंचायत समिती, भिम युवा पँथर (क.से.विरोधी), बौद्ध महासभा, पावस विभाग बौद्ध विकास संघ यांसारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत संघर्ष समितीची स्थापना केली. सुमारे ६२ गावांतील धम्मबांधव या समितीत सहभागी झाले आहेत.
२७ जून रोजी झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले की, सद्यस्थितीत असलेल्या ट्रस्टचा आणि वादग्रस्त जमिनीचा काहीही संबंध नसून, जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेली नवी ट्रस्ट स्थापन केली जाणार आहे. या ट्रस्टमध्ये बौद्ध समाजासह इतर धर्मियांचाही समावेश असणार असून, सदर कम्युनिटी सेंटर सर्व धर्मीयांसाठी खुले राहणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिल्याचे आवाहन पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
बौद्ध समाजाच्या भावनांशी निगडीत असलेल्या या जागेचे अस्तित्व अबाधित ठेवून तिथे फक्त आणि फक्त बुद्धविहार व्हावे, या मागणीसाठी संघर्ष समितीने निर्धार व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस समाजातील सर्व धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार, कार्याध्यक्ष अनंत सावंत, सचिव अमोल जाधव , कोषाध्यक्ष नरेंद्र आयरे आणि उपाध्यक्ष प्रकाश पवार यांनी केले आहे.