(जाकादेवी / वार्ताहर)
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीने त्या प्रतीची मोडतोड करून विटंबना केलेली आहे. सदर विटंबना करणारा आरोपी हा भारतीय संविधान मानणारा नाही, असे दिसून येत आहे, ही भारतीय लोकशाहीला काळीमा फासणारी अशी घटना आहे. अशा प्रकारच्या घटना करणाऱ्या आरोपीस पोलीस मनोरुग्ण म्हणून संबोधन असतील तर अशा घटना महाराष्ट्रावर वारंवार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपला महाराष्ट्र थोर संत महात्म्यांची, विचारवंतांची परंपरा लाभलेली भूमी आहे. अशा महाराष्ट्रात देशद्रोहाच्या घटना घडू नयेत, अशा घटना उद्भवून महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक वातावरण बिडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तरी सदर प्रकरणी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आग्रही मागणी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती, रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभा (मिराताई आंबेडकर) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ सोसायटी ऑफ इंडिया (मोकळे प्रणित गट ) रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या संयुक्त समितीच्या मार्फत करण्यात आली आहे.
आंबेडकरी विचारधारेच्या आंदोलनांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रकाश पवार, एम.बी. कांबळे, सुहास कांबळे, विजय आयरे, विजय मोहिते, शिवराज जाधव, शरद सावंत आदी उपस्थित होते.