(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, शाखा रत्नागिरीच्या वतीने तालुक्यातील नूतन शिक्षण विस्तार अधिकारी आणि विभागीय स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या केंद्र समन्वयकांचा सत्कार सोहळा, आरोग्य मार्गदर्शन तसेच विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन फाटक हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष राहुल अलकटवार होते. तालुका कार्याध्यक्ष तुकाराम मुरकुटे यांनी प्रास्ताविक केले.
नूतन अधिकाऱ्यांचा गौरव
नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या कॉमन पूल शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे, सारीक शिंदे तसेच नवनियुक्त केंद्र समन्वयकांचा विद्यार्थीहित आणि गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त केंद्र समन्वयकांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्यात आले.
आदर्श शिक्षक अंकलगे सर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश चांगण, जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर आणि महिला आघाडी प्रमुख विभा बाणे यांनी मनोगतातून नूतन अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला चिपळूण तालुकाध्यक्ष अविनाश जाधव यांचीही उपस्थिती होती. यावेळी डॉ. मधुरा सावंत यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
‘खेळ पैठणीचा’ आणि ‘फनी गेम्स’मध्ये शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
सत्कार सोहळ्यानंतर महिला शिक्षकांसाठी ‘खेळ पैठणीचा’, तर पुरुष शिक्षकांसाठी ‘फनी गेम्स’ आयोजित करण्यात आले. दोन्ही स्पर्धांना शिक्षक बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘खेळ पैठणीचा’मध्ये माधुरी अनिकेत शिंदे-पाटील यांनी प्रथम, तर शिवशाला लक्ष्मण सोनटक्के यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. पुरुषांच्या ‘फनी गेम्स’मध्ये संजीवन पांडुरंग दराडे यांनी प्रथम, तर नवनाथ तानाजी वाळवेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्यांना निवेंडी केंद्राच्या केंद्र समन्वयक अमृता इनामदार, कळझोंडी केंद्राच्या केंद्र समन्वयक प्राजक्ता पाटील, दत्तात्रय क्षीरसागर, राहुल अलकटवार, तुकाराम मुरकुटे, रामनाथ बने, गणपती पडुळे आणि अवधूत शिंदे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची उत्कृष्ट तयारी आणि नियोजन जुनी पेन्शन संघटना रत्नागिरी तालुका कार्यकारिणी आणि महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमासाठी खास थीम साँग तयार करण्यात आले होते. रामदास चव्हाण यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर तालुका सरचिटणीस अवधूत शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुक्यातील शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

