(संगमेश्वर / प्रतिनिधी)
परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचलित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुल विभागात आयोजित निवासी शिबिरातील क्रांती दिन पूर्वसंध्येचा कार्यक्रम इतिहासाच्या प्रेरणादायी आठवणींनी रंगला. प्रसिद्ध प्रवचनकार, व्याख्याते व इतिहास अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.
शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी आयोजित निवासी शिबिराची सुरुवात ‘क्रांतीचा गर्जा जयजयकार’ या विशेष कार्यक्रमाने झाली. इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार’ या कुसुमाग्रजांच्या प्रसिद्ध गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यानंतर संगमेश्वर-धामणी येथील प्रसिद्ध प्रवचनकार, व्याख्याते व इतिहास अभ्यासक श्रीनिवास पेंडसे यांनी ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. १८५७च्या राष्ट्रीय उठावापासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ओघवत्या शैलीत आढावा घेतला. त्यांच्या माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विवेचनातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अधिक जवळून समजून घेता आला.
विद्यार्थ्यांनी घेतली पेंडसे यांची मुलाखत
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गुरुकुलमधील दहा विद्यार्थ्यांनी श्रीनिवास पेंडसे यांच्याशी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांच्या जीवनप्रवासासह कार्यक्षेत्रातील अनुभव, यश आणि वाटचालीबाबत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले.
या मुलाखतीची पूर्वतयारी विद्यार्थ्यांनी आठवडाभर केली होती. वाचन आणि इंटरनेटच्या माध्यमातून पेंडसे यांच्याबद्दल माहिती संकलित करून विद्यार्थ्यांनी सुमारे ७० प्रश्न तयार केले. त्यापैकी निवडक १५ प्रश्नांची प्रश्नावली तयार करून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी धिटाईने आणि उत्स्फूर्तपणे विचारलेल्या प्रश्नांमुळे मुलाखत अधिक रंगतदार झाली.
या कार्यक्रमाला गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यक्तिचित्र देऊन पेंडसे यांचा सन्मान
गुरुकुल शाळा समितीच्या अध्यक्षा सौ. सारिका भावे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय बनसोडे आणि विभागप्रमुख मंगेश मोने यांच्या हस्ते श्रीनिवास पेंडसे यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. गुरुकुलमधील इयत्ता आठवीतील विद्यार्थी वेदांत टाकळे यांनी काढलेले पेंडसे यांचे व्यक्तिचित्र आणि भेटवस्तू त्यांना प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुलच्या अध्यापिका सौ. दीपा गद्रे यांनी केले.
निवडणूक प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव
निवासी शिबिरातील रात्रीच्या भोजनानंतरच्या सत्रात गुरुकुलमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधी आणि मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. अभ्यास, शिस्त, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य आणि परिपाठ अशा विविध विभागांसाठी मंत्री तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडण्यात आले. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना अनुभवातून समजावी, या उद्देशाने मतदान व निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले. यानंतर विद्यार्थ्यांना क्रांतिकारक चाफेकर बंधूंवर आधारित चित्रपट दाखविण्यात आला. इतिहास, स्वातंत्र्यलढा, नेतृत्वगुण आणि लोकशाही प्रक्रियेचा अनुभव देणाऱ्या विविध उपक्रमांमुळे गुरुकुलमधील निवासी शिबिर विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरले.

