( रत्नागिरी /प्रतिनिधी )
नववर्षाच्या पहिल्याच शुभ सकाळी, गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) ६५ व्या महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या औचित्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. साप्ताहिक उपक्रमांतर्गत आयोजित या विशेष सायकल राईड मोहिमेत रत्नागिरी पोलीस दलातील श्रीमती रमा करमरकर या आपल्या सहकाऱ्यांसह रत्नागिरी ते छत्रपती संभाजीनगर असा सुमारे ६५० किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करण्यासाठी रवाना झाल्या आहेत.
ही सायकल राईड मोहीम पाच दिवसांच्या कालावधीत पूर्ण होणार असून, प्रवासादरम्यान ६५ हून अधिक पोलीस ठाण्यांना भेटी देत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जाणार आहेत. नागरिकांमध्ये पोलीस दलाबाबत विश्वास, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दृढ करण्याचा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रत्नागिरी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झाला. मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या शुभहस्ते सायकलस्वारांना हिरवा झेंडा दाखवून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी सायकलस्वारांना शुभेच्छा देत त्यांच्या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या कार्यक्रमास मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेली ही सायकल राईड मोहीम पोलीस दलातील शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे प्रभावी प्रतीक ठरत असून, नववर्षाच्या प्रारंभीच समाजाला सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश देणारी ठरली आहे.

