(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषि महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कोळंबे गावात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मृदासूत गटाने तेलीवाडी येथे ‘नायलॉन जाळी’ च्या सहाय्याने नारळ पिकावरील (५ वर्षांखालील) गेंड्या भुंगा किडींच्या पर्यावरण पुरक व्यवस्थापनावर प्रात्यक्षिक सादर केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने सन २०२४ मध्ये (३.२ से. मी. × ३.२ से. मी. मेश) नायलॉन जाळी वापरून गेंड्या भुंगा किडींच्या च्या व्यवस्थापनासाठी शिफारस केली होती. सदर प्रात्यक्षिक ह्या शिफारसीच्या आधारावर सादर करण्यात आले.
सदर प्रात्यक्षिकास प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषितज्ञ व केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले.
डॉ. संतोष वानखेडे यांनी या पध्दतीचे उपस्थितांना तंत्र विषद केले तसेच नारळ पिकावरील विविध किडी आणि त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली व शेतकऱ्यांच्या शंकांचे निवारण केले. डॉ. किरण मालशे यांनी शेतकऱ्यांना प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राच्या संपर्कात राहून नारळ उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानांविषयी माहिती व प्रशिक्षणं घेऊन नारळाचे उत्पादन वाढविण्याकरिता प्रोत्साहित केले. ह्या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि त्यांनी हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा मानस व्यक्त केला.