(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रस्ते अपघात ही अनपेक्षित आणि अनेकदा जीवघेणी ठरणारी आपत्कालीन परिस्थिती असते. अशा वेळी घाबरून न जाता योग्य निर्णय घेणे हेच एखाद्याचा जीव वाचवण्यास निर्णायक ठरते. अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी आणि नागरिकांनी जबाबदारीने वागावे, यासाठी ‘भारतीय मानवाधिकार असोसिएशन’ व पोलीस संरक्षण विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे.
अपघातानंतरचा पहिला एक तास म्हणजेच ‘गोल्डन अवर’ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या कालावधीत योग्य उपचार मिळाल्यास गंभीर जखमी व्यक्तीचा जीव वाचण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे तात्काळ रुग्णवाहिका तसेच पोलिसांना माहिती देणे हे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल ठरते. प्रथमोपचाराचे ज्ञान असल्यास, जखमीच्या रक्तस्रावावर स्वच्छ कापडाने दाब देऊन तो थांबवण्याचा प्रयत्न करावा. मात्र वैद्यकीय प्रशिक्षण नसताना कोणतेही धोकादायक हस्तक्षेप टाळणे आवश्यक आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘गुड समॅरिटन’ कायद्यानुसार अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना पोलिस चौकशी किंवा कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असे स्पष्ट संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन मदत करणे अपेक्षित आहे. अपघाताच्या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्य असल्यास अपघातग्रस्त वाहन बाजूला करून रस्ता मोकळा ठेवावा, जेणेकरून रुग्णवाहिकेचा मार्ग सुकर होईल.
काय टाळावे?
जखमी व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने हलवणे टाळावे, विशेषतः मान किंवा पाठीला इजा झाल्याचा संशय असल्यास अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला पाणी किंवा कोणतेही पेय देणे धोकादायक ठरू शकते.
तसेच अपघातस्थळी गर्दी करणे, फोटो किंवा व्हिडिओ काढण्यात वेळ घालवणे हे गंभीर दुर्लक्ष मानले जाते. मदतीपेक्षा उत्सुकतेला प्राधान्य देणे अनेकदा परिस्थिती अधिक बिघडवते. अपघाताचे कारण शोधण्याऐवजी जखमींचा जीव वाचवणे हेच प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय एखाद्या व्यक्तीचे आयुष्य वाचवू शकतो, हेच या जनजागृतीचे मुख्य संदेश आहे. नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागून रस्ते सुरक्षा संस्कृती मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

