(खेड / वार्ताहर)
खेड तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीशी एसटी बसमध्ये छेडछाड केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. या प्रकरणी खेड आगारातील वाहक बी. डी. गोचडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, एसटी प्रशासनानेही तत्काळ कारवाई करत संबंधित वाहकाला सेवेतून निलंबित केले आहे.
पीडित विद्यार्थिनी खेड आगाराच्या बसमधून प्रवास करीत होती. प्रवासादरम्यान वाहक गोचडे हा विद्यार्थिनीकडे विविध प्रकारची माहिती विचारत तिच्याशी गैरवर्तन करीत असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या विद्यार्थिनीने आपल्या आसनावरून उठून बसमध्ये बाजूला उभे राहणे पसंत केले. दरम्यान, विद्यार्थिनी बसमधून उतरल्यानंतरही वाहकाने तिचा पाठलाग करून मोबाईल क्रमांक मागण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने महाविद्यालयातील प्राचार्यांना सांगितल्यानंतर प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले. याची माहिती मिळताच शिवसेनेचे उपनेते संजय कदम यांनी थेट खेड बस स्थानक गाठले. कदम बस स्थानकात पोहोचले असता स्थानकप्रमुख उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आगारप्रमुखांशी संपर्क साधण्यात आला. आगारप्रमुख बस स्थानकात दाखल झाले; मात्र स्थानकप्रमुखांनी स्थानकात येण्यास विलंब केल्याने कदम यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांचे पथकही बस स्थानकात दाखल झाले. वाहतूक नियंत्रक कक्षाच्या परिसरात नागरिक आणि संबंधितांची मोठी गर्दी झाली होती. घटनेनंतर संशयित वाहक सेवा बजावण्यासाठी चिपळूण येथे गेला होता. एसटी प्रशासनाने त्याला तातडीने खेड बस स्थानकात येण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तो खेड येथे आल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार संबंधित वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, आगारप्रमुखांनी घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. या अहवालाच्या आधारे विभागीय वाहतूक नियंत्रकांनी संबंधित वाहकाला सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली जात आहे.

