(खेड)
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम राबवताना खेड पोलीस ठाण्याने सलग तिसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे. ३१ मे रोजी दाखल करण्यात आलेल्या NDPS कायद्यानुसार सुरू असलेल्या तपासादरम्यान, ०४ जून रोजी एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी गांजा तस्करांवर धडक कारवाई करण्यात आली. एकूण २.०६६ किलो गांजा जप्त करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असण्याचा संशय आहे.
पहिली कारवाई – दुचाकीस्वार गांजा तस्कर पकडला
खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंबईहून आलेला एक इसम पांढऱ्या दुचाकीवरून गांजाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. भरणे नाका, खेड येथे सापळा रचून कमलेश उर्फ सुजल उर्फ रंजीत विचारे (वय २०, रा. वसई-पालघर, सध्या रा. शिवतर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १.०४४ किलो गांजा व Yamaha R15 स्पोर्ट्स बाईक जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 184/2025 नोंदवून NDPS कायद्याच्या कलम 8C, 20B, 28 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई – रेल्वे स्थानकात तस्कर जेरबंद
दुसऱ्या कारवाईत, तुतारी एक्स्प्रेसमधून गांजा घेऊन येणाऱ्या इसमाबाबत माहिती मिळाल्यानंतर खेड रेल्वे स्थानकात सापळा रचण्यात आला. त्यानुसार रवींद्र प्रेमचंद खेरालिया (वय २५, रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. मिरा रोड, ठाणे) याला हिरव्या रंगाच्या बॅगेसह अटक करण्यात आली. त्याच्याकडून १.०२२ किलो गांजा हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 185/2025 नोंदवून NDPS कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना ०४ जून रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. प्रारंभिक तपासात दोघेही एकाच ड्रग कार्टेलशी संबंधित असल्याचे संकेत मिळाले असून, पोलीस कार्टेल प्रमुखाचा शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर आणि त्यांच्या पथकाने केली.
या कारवाईत स.पो.नि. श्री. संजय पाटील, पो.कॉ. रूपेश जोगी, सुमित नवघरे, रोहित जोयशी, अजय कडू, राम नागुलवार, वैभव ओहोळ, पो.हवा. विक्रम पाटील (स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा, रत्नागिरी) आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.