(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वेतोशी येथे झालेल्या बैठकीला उपस्थित राहिल्याचा राग मनात धरून एका तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी खांबावर जोरात ढकलून दुखापत केल्याची घटना करबुडे फाटा येथे घडली. यानंतर दगड उचलून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महेश सुरेश गोरे (३८, रा. वेलवंड धनगरवाडी, रत्नागिरी) हे ७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या आतेभावासोबत चिरे खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी करबुडे फाटा येथे गेले होते. त्यावेळी वेतोशी धनगरवाडी येथील जगदिश कृष्णा झोरे (३५) याने गोरे यांच्याशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. काही दिवसांपूर्वी वेतोशी गावात झालेल्या बैठकीला महेश गोरे आणि त्यांचे भाऊ राजेश शिंदे हे गावातील रहिवासी नसतानाही उपस्थित राहिल्याचा राग झोरे याच्या मनात होता. याच कारणावरून त्याने गोरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या प्रकाराबाबत गोरे यांनी झोरे याला विचारणा केली असता, त्याने कथितपणे गोरे यांना बाजूला असलेल्या बंद दुकानाच्या शेडमधील लोखंडी खांबावर जोरात ढकलले. या घटनेत गोरे यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. इतक्यावर न थांबता झोरे याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड उचलला आणि महेश गोरे तसेच त्यांचे भाऊ राजेश शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर महेश गोरे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जगदिश झोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा क्रमांक १५३/२०२६ दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

