(खेड)
रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मंदिरांमध्ये झालेल्या घंटा चोरीच्या घटनांप्रकरणी खेड पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हिरालाल गंगारामजी कुम्हार (रा. पनवेल, मूळ गाव राजस्थान) याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ८ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि २५३ किलो पितळ असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
खेड तालुक्यातील शिरगाव खुर्द–शिवाजीनगर येथील मंदिरातून पितळी घंटा व सीसीटीव्ही डीव्हीआर चोरीला गेल्याप्रकरणी यापूर्वी राकेश तुळशीराम पडवकर याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीत तब्बल १६ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना दुसऱ्या संशयिताचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हिरालाल कुम्हार याला जेरबंद केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या दुसऱ्या अटकेमुळे मंदिर चोरीशी संबंधित आणखी काही मोठ्या प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.

