(खेड /प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावर लोटे एमआयडीसी परिसरात भरधाव वेगाने आणि हयगयीने चालविलेल्या महिंद्रा थारने एका अनोळखी महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना ६ ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. या अपघातात अंदाजे ४५ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली असून, तिची ओळख अद्याप पटलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आरिफ इसाक साठविलकर (वय ३७, रा. परळेमाण, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा थार रॉक्स (एमएच ०९/जीयू/७२७५) घेऊन ६ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.१० वाजता खेडहून चिपळूणच्या दिशेने जात होता. लोटे एमआयडीसीतील कॉर्टेवा कंपनीसमोर महामार्गावर आल्यानंतर त्याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविले. याचवेळी मध्यवर्ती दुभाजकाजवळून खेडच्या दिशेने पायी जात असलेल्या अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी महिलेला थारने समोरून धडक दिली. या धडकेत महिलेला किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. अपघातात थारच्या वाहनाचेही किरकोळ नुकसान झाले.
घटनेनंतर या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात पोहेकॉ अजित संतोष कदम यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक २३२/२०२६ नोंदविला असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जखमी महिलेचे नाव, गाव व इतर ओळख अद्याप समोर आलेली नसून, पोलिसांकडून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघाताची नोंद २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३४ वाजता करण्यात आली.

