(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मूल होण्यासाठी औषध तयार करून विशेष विधी करावा लागेल, असे सांगत एका महिलेचा विश्वास संपादन करून दोन अज्ञात महिलांनी तिच्याकडील तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी शहरात घडला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात दोन संशयित महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरातील एका महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. १६ जुलै रोजी दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी महिलांनी तिच्याशी संपर्क साधला. मूल होण्यासाठी औषध तयार करून त्यावर विधी करावा लागेल, असे त्यांनी महिलेला सांगितले. दोन्ही महिलांनी बोलण्यातून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विधी करण्यासाठी अंगावरील सोन्याचे दागिने कागदात गुंडाळून साडीमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले. महिलेने त्यांच्या सांगण्यावरून दागिने कागदात गुंडाळून ठेवले. मात्र, याच वेळी संशयित महिलांनी हातचलाखी करत दागिन्यांचे पुडके बदलले आणि क्षणात तेथून निघून गेल्या.
काही वेळाने आपल्याकडील दागिने चोरीला गेल्याचे महिलेच्या लक्षात आले. या प्रकारात ६९ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स, असे एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तातडीने रत्नागिरी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दोन अज्ञात संशयित महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६ (२), ३१८ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अंधश्रद्धेचा आधार घेत फसवणूक
मूल होण्यासंबंधी महिलेच्या भावनिक परिस्थितीचा गैरफायदा घेत संशयितांनी विधीच्या नावाखाली ही फसवणूक केल्याचा संशय आहे. या प्रकरणातील दोन्ही संशयित महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

