(रत्नागिरी / प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत “अंगदान जीवन संजीवनी” अभियान देशभर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे दीपप्रज्वलनाने पार पडला. या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि वरीष्ठ आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांनी अंगदानाची आवश्यकता, प्रक्रिया आणि त्यामागील वैज्ञानिक भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मृत्यूनंतरही माणूस आपल्या अवयवांच्या माध्यमातून दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश पेरू शकतो.
सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात नेत्र संकलन केंद्र कार्यरत असून, गेल्या वर्षभरात १० मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना पुन्हा दृष्टिकोन मिळाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी यावेळी आवाहन केले की, जास्तीत जास्त नागरिकांनी मरणोत्तर नेत्र व अवयवदानासाठी नोंदणी करावी.
ब्रेन डेड झालेल्या रुग्णांचे हृदय, यकृत, स्वादुपिंड, किडनी, डोळे अशा अवयवांचे दान केल्यास किमान आठ रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात. यासाठी विभागीय पातळीवर वैद्यकीय समितीची मान्यता आवश्यक असते. अशाच प्रकारची एक यशस्वी प्रक्रिया रत्नागिरी जिल्ह्यात नुकतीच पार पडली असून, कोल्हापूर विभागीय मंडळाने मंजुरी दिल्यानंतर एका व्यक्तीच्या अवयवांचे यशस्वी दान झाले आहे.
अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा नोडल अधिकारी श्री. संदीप उगवेकर यांनी नेत्रदानाचे महत्व विशद केले, तर नेत्रदान समुपदेशक श्री. राम चिंचाळे यांनी उपस्थितांमार्फत अवयवदान प्रतिज्ञा घेतली. नेत्रविभाग प्रमुख डॉ. वनिता कानगुळे यांनी प्रत्यारोपणासाठी आवश्यक असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालय रत्नागिरी व मेडिकल कॉलेज डेरवण येथे नावनोंदणीसाठी आवाहन केले.
या कार्यक्रमास NCD वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तमराव कांबळे, डॉ. आठले मॅडम, डॉ. गावंडे, डॉ. यश प्रसादे, मेट्रन जयश्री शिरधनकर, सिस्टर रसिका सावंत, सिस्टर आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन भरणे, समुपदेशक प्रवीण भोईर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सांगता क्षणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी अत्यंत मोलाचे विचार व्यक्त करत सांगितले, मृत्यू नंतरही जीवन देता येते! आपल्या एका निर्णयामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. अवयव व नेत्रदान हे मानवतेचे सर्वोच्च प्रतीक आहे. समाजात जागृती निर्माण करून आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा.