(रत्नागिरी / वार्ताहर)
उच्च शिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी झाली असली तरी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर इतर विषयांच्या तुलनेत संस्कृत विषयाच्या अभ्यासक्रमाची स्थिती आणि अंमलबजावणीची प्रक्रिया अद्याप प्रगतीपथावर आहे. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील संस्कृत शिक्षणामध्ये समन्वय साधून विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि रत्नागिरी जिल्हा संस्कृत शिक्षक मंडळ यांच्या वतीने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये संस्कृत गुणगौरव समारंभ आणि कृतिसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. साखळकर बोलत होते. यावेळी संस्कृतभारती पश्चिमक्षेत्र प्रशिक्षण प्रमुख नीरज दांडेकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तथा संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये आणि रत्नागिरी संस्कृत शिक्षक मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्मिता सरदेसाई व्यासपीठावर उपस्थित होत्या.
डॉ. साखळकर यांनी संस्कृत भाषेच्या ज्ञानपरंपरेतील योगदानावर प्रकाश टाकला. संस्कृत ही प्राचीन भाषा असून वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता, कालिदासांचे साहित्य तसेच गणित, आयुर्वेद, खगोलशास्त्र, व्याकरण आणि तत्त्वज्ञान यांसारख्या विविध ज्ञानशाखांचा अमूल्य ठेवा संस्कृतमध्ये उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयात संस्कृत विषयाचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयात बीए संस्कृत, एमए संस्कृत तसेच इतर २८ यूजी आणि १६ पीजी अभ्यासक्रम पद्धतीनुसार शिकवले जात आहेत. संस्कृत हा विषय आर्ट्स फॅकल्टीबरोबरच सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टीमध्येही ‘अॅबिलिटी एन्हाँसमेंट कोर्स’ म्हणून क्रेडिट्सच्या स्वरूपात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे इतर शाखांमधील विद्यार्थ्यांनाही संस्कृत शिकण्याची संधी मिळत असल्याचे डॉ. साखळकर यांनी नमूद केले.
नीरज दांडेकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली असून २०३० पर्यंत सर्व राज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. या धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या बदलांकडे शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारचा शालेय अभ्यासक्रम आराखडा मिळताजुळता आहे. बदललेल्या उच्च शिक्षण अभ्यासक्रमाचा विचार करून शालेय अभ्यासक्रमातही बदल केल्यास विद्यार्थ्यांसमोरील अडचणी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
स्मिता सरदेसाई यांनी संस्कृत शिक्षक मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. संस्कृत शिक्षक मंडळ १९७८ पासून कार्यरत असून काही दिवंगत आणि माजी शिक्षकांनी ही संघटना चांगल्या पद्धतीने जोपासली. त्याच कार्याची परंपरा पुढे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कृतिसत्राचा समारोप विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह आजी-माजी शिक्षकांच्या सन्मानाने होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संस्कृत विषयाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी डॉ. कल्पना आठल्ये यांचे नेहमीच मार्गदर्शन आणि सहकार्य लाभते. संस्कृत विषयासंदर्भातील नवनवीन कल्पनाही त्या मांडत असतात. त्यांच्या सहकार्यामुळेच येथे हा कार्यक्रम आयोजित करता आला, असे स्मिता सरदेसाई यांनी सांगितले.
यावेळी डॉ. मकरंद साखळकर, डॉ. कल्पना आठल्ये आणि नीरज दांडेकर यांचा स्मिता सरदेसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील संस्कृत शिक्षक तसेच गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील संस्कृत विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. कल्पना आठल्ये यांनी आभार मानले.


