(रत्नागिरी / लांजा)
लांजा तालुक्यातील आडवली येथील ७५ वर्षीय वृद्धाचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांनी विषारी पदार्थ प्राशन केल्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम भागोजी खाके (वय ७५, रा. आडवली, ता. लांजा) हे मागील काही काळापासून आजारपणाने त्रस्त होते. ५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी विषारी पदार्थ प्राशन केला. त्यानंतर काही वेळात त्यांना त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती गंभीर असल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १०८ रुग्णवाहिकेने त्यांना रत्नागिरी येथे आणण्यात आले. सिव्हील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती त्यांचा मुलगा शशिकांत सीताराम खाके यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या खबरीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्र. ४०/२०२६) करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून सुरू आहे.

