(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे येथील बुद्धविहारात वर्षावास धार्मिक प्रबोधन कार्यक्रम उत्साहात पार पडला. बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच कोळीसरे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १५ यांच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोळीसरे गाव शाखेचे अध्यक्ष किरण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम झाला. यावेळी तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष तथा संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार यांच्यासह तालुका शाखेच्या विविध उपसमित्यांचे पदाधिकारी, श्रामणेर, बौद्धाचार्य, गाववार प्रतिनिधी तसेच बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोळीसरे बुद्धविहारातील बुद्धविहाराच्या आदर्शांसमोर मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून दीप व गंध प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्रामणेर बौद्धाचार्य संघाच्या वतीने धार्मिक पूजापाठ घेण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे कोळीसरे गाव शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कोळीसरे गाव शाखेतील तरुण अमोल संतोष सावंत हा शिक्षक भरतीसाठी पात्र ठरल्याबद्दल त्याचा कोळीसरे गाव शाखा आणि रत्नागिरी तालुका शाखेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्याला पुढील शिक्षक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमात श्रामणेर बौद्धाचार्य संतोष कदम (बसणी) यांचे धम्मविषयक प्रवचन झाले. भगवान गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले प्रेरणादायी विचार याबाबत त्यांनी उपस्थितांना प्रबोधन केले. त्यानंतर तालुका शाखेच्या संघटनात्मक कामकाजाबाबत अध्यक्ष प्रकाश पवार यांनी मार्गदर्शन केले. संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे यांनी वर्षावास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
अध्यक्षीय मनोगतात किरण सावंत यांनी तालुका शाखेच्या वतीने विविध उपक्रमांसोबत वर्षावासासारखा धार्मिक कार्यक्रम राबविला जात असल्यामुळे गावागावांत खऱ्या अर्थाने जनजागृती होत असल्याचे सांगितले. अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच कोळीसरे गाव शाखेला वर्षावास कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोळीसरे गाव शाखेचे प्रमुख पदाधिकारी, महिला मंडळ तसेच सभासद बंधू-भगिनींनी विशेष मेहनत घेतली.


