(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मार्चच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र होत असून, वाढत्या तापमानामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी वाढत्या उकाड्याच्या काळात विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने चढत असून, तो ३० ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवला जात आहे. आगामी काही दिवसांत या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता प्रकर्षाने जाणवत असून, उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
रत्नागिरी हा किनारपट्टीचा जिल्हा असल्याने हवेतील आर्द्रतेचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उष्णतेची जाणीव अधिक तीव्र होत असून, नागरिकांना घाम, अंगातील अशक्तपणा, डोकेदुखी आणि थकवा अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास उष्माघात, पित्ताचे विकार, तापसरी आणि खोकल्यासारख्या तक्रारी वाढू शकतात, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष कार्यान्वित ठेवण्यासह आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात हवामानात काहीसा बदल अपेक्षित असून तापमानात किंचित घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मान्सूनपूर्व पावसाची चिन्हे दिसत असून, हवामान बदलल्यास उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. हवामानातील या बदलत्या स्वरूपात नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा आणि उन्हापासून संरक्षण करणारे उपाय करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

