(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सलग दुसऱ्या महिन्यात राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम’ांतर्गत ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून विविध सेवांच्या कामगिरीचे करण्यात येणाऱ्या मूल्यमापनात रत्नागिरी पोलिसांनी जून आणि जुलै २०२६ या दोन्ही महिन्यांत ‘ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्व्हिस’ तसेच ‘सर्वाधिक नागरिक समाधान गुण’ या दोन्ही निकषांवर राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना विविध शासकीय सेवा ठरावीक कालमर्यादेत आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टल कार्यरत आहे. या माध्यमातून विविध विभागांच्या कामगिरीचे नियमित मूल्यमापन केले जाते. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सलग दोन महिने आघाडीवर राहत आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटविली आहे. जून २०२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे विविध शासकीय सेवांसाठी १,७२३ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १,६१० अर्जांचा वेळेत निपटारा करण्यात आला. या कामगिरीबद्दल ‘आपले सरकार’च्या मूल्यमापनात रत्नागिरी पोलिसांना टिमलीनेस स्कोअर १५.३२ मिळाला. तसेच ‘सर्वाधिक नागरिक समाधान गुण’ या निकषात १०.७२ गुण मिळवत रत्नागिरी पोलिसांनी राज्यात प्रथम स्थान पटकावले.
जुलै महिन्यातही रत्नागिरी पोलीस दलाने आपली आघाडी कायम राखली. या महिन्यात विविध शासकीय सेवांसाठी १,८०७ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,७१२ अर्जांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. जुलैच्या मूल्यमापनातही रत्नागिरी पोलीस दलाने ‘ओव्हरऑल टॉप परफॉर्मिंग सर्व्हिस’मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर ‘सर्वाधिक नागरिक समाधान गुण’ या श्रेणीतही अव्वल स्थान कायम ठेवले. जुलैमध्ये ‘टिमलीनेस स्कोअर’ ५०.६४, तर ‘सर्वाधिक नागरिक समाधान गुण’ ३५.६६ इतके नोंदविण्यात आले.
वेळेत सेवा देण्यावर भर
सलग दोन महिन्यांची ही कामगिरी नागरिकांना वेळेत, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे फलित मानले जात आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी साध्य झाल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ घेताना अनावश्यक विलंब होऊ नये, सेवा अधिक गतिमान आणि पारदर्शक व्हावी, यासाठी पोलीस दलाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. भविष्यातही नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

