(गुहागर /रत्नागिरी प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेडने (आरजीपीपीएल) अखेर अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या तीन ग्रामपंचायतींचा थकीत कर भरण्याची तयारी दर्शवत तब्बल ७ कोटी १ लाख २० हजार ७२७ रुपयांची रक्कम जमा केली आहे. कंपनीने सहा वर्षांच्या थकीत करापैकी ५० टक्के रक्कम भरल्याने प्रस्तावित जप्तीची कारवाई तूर्तास टळली आहे.
आरजीपीपीएलने गेल्या चार वर्षांपासून आपण सरकारी कंपनी असल्याने इमारत व जमीन कर लागू होत नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे कंपनी आणि संबंधित ग्रामपंचायतींमध्ये करआकारणीवरून वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाची गुहागर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद स्तरावर सुनावणी झाली. त्यानंतरचा निर्णय अंजनवेल, वेलदूर आणि रानवी ग्रामपंचायतींच्या बाजूने लागला. मात्र, या निर्णयाला कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. दरम्यान, थकीत कराच्या वसुलीसाठी तिन्ही ग्रामपंचायतींनी महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार २८ जुलै २०२६ रोजी कंपनीच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कंपनी प्रशासनाने तातडीने ५० टक्के कर भरण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतींसमोर ठेवत जप्तीची कारवाई स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीतील एकूण थकीत कराच्या निम्म्या रकमेचा भरणा करण्यात आला.
या रकमेपैकी अंजनवेल ग्रामपंचायतीला ४ कोटी ७५ लाख ५४ हजार १५८ रुपये, रानवी ग्रामपंचायतीला १ कोटी २४ लाख ३७ हजार ४२ रुपये, तर वेलदूर ग्रामपंचायतीला १ कोटी १ लाख २९ हजार ५२७ रुपये प्राप्त झाले. या करवसुलीच्या यशाबद्दल गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती नीलेश सुर्वे यांनी तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांचे अभिनंदन केले. तिन्ही ग्रामपंचायतींनी एकजुटीने घेतलेल्या भूमिकेमुळे हा निकाल शक्य झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जप्तीची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तिन्ही ग्रामपंचायती आणि आरजीपीपीएल प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप झाला नसल्याचे सभापती आणि उपसभापती यांनी स्पष्ट केले.
उर्वरित ५० टक्के थकीत कराची रक्कमही कंपनीकडून वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतींचा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीस आरजीपीपीएलचे प्रतिनिधी अतुल देसाई, पंचायत समिती सदस्य गौरव वेल्हाळ, मंगेश जोशी, सारिका दाभोळकर, अंजनवेलच्या सरपंच सोनाली मोरे, रानवीच्या सरपंच मनाली कदम, वेलदूरच्या सरपंच दिव्या वनकर, उपसरपंच बाळकृष्ण सुर्वे, सदस्य यशवंत बाईत, इकबाल पंची, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

