(रत्नागिरी)
उज्वल शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी या प्रशालेने यंदाही इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत तब्बल १६ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान सुनिश्चित करत शिष्यवृत्ती मिळवली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या प्रशालेने शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्कृष्ट निकालाची परंपरा यशस्वीरित्या पुढे चालू ठेवली आहे. संस्थेचे पदाधिकारी श्रीराम भावे, सुनील (दादा) वणजू आणि नचिकेत जोशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे आणि कल्पना शिरोळकर यांनी देखील विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आभा घारपुरे, आराध्य फणसे, अर्णव मरगाळे, दुर्वा चव्हाण, गिरीश जाधव, हर्ष सकपाळ, इंद्रनील आठले, ईशान नेवरेकर, सानवी झगडे, श्लोक धुमाळे, त्रिशा नेवरेकर, उन्नती बंदरकर, स्वराली टापरे, वल्लरी मुकादम, वरद भोये आणि विणा बंडबे यांचा समावेश आहे.
या यशामागे परीक्षेपूर्वी घेतलेल्या अभ्यास सत्रांचे, सराव चाचणींचे आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे मोठे योगदान आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभागप्रमुख म्हणून शिक्षिका श्रद्धा बोडेकर यांनी नियोजन करत सत्रांचे समर्पक आयोजन केले.
विषयवार मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये मराठीसाठी – गायत्री गवळी, मीना ताडे, श्रद्धा हर्डीकर, गणितासाठी – रमेश कनोजे, मीनल बागवे, इंग्रजीसाठी – माणिक भोये, पुनम काटकर, बुद्धिमत्तासाठी – श्रद्धा बोडेकर, हेमलता गुरव यांनी आपल्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार केले होते.
पटवर्धन हायस्कूलमध्ये अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्धा परीक्षांचेही नियोजन नियमितपणे केले जाते. संस्था पदाधिकारी आणि मुख्याध्यापक यांच्या सुयोजित नियोजनामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांकडून विविध पद्धतीने अभ्यास घेऊन त्यांची परीक्षेसाठी तयारी केली जाते. यंदाच्या घवघवीत यशामुळे प्रशालेच्या यशस्वी परंपरेत आणखी एक उज्ज्वल पानाची भर पडली आहे.

