(रत्नागिरी )
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्सच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने खेर्डी, चिपळुणमधील हॉटेल तेज ग्रँड येथे नुकतेच चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्राला चिपळूण आणि परिसरातील बहुसंख्य सीए उपस्थित होते.
प्रास्ताविक रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी केले. त्यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयोजित विविध उपक्रम, चर्चासत्र आणि आगामी काळात कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे, याची माहिती दिली. सकाळच्या सत्रामध्ये डोंबिवली येथील सीए शेखर पटवर्धन यांनी २०२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे या विषयावर मार्गदर्शन केले. आयकर कायद्यामध्ये झालेल्या बदलांबाबत चर्चा झाली. दुपारच्या सत्रामध्ये ठाणे येथील सीए राजेश आठवले यांनी भांडवली नफ्यावरील ठळक मुद्दे या विषयावर मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे. त्याबाबत माहिती दिली.
अशा चर्चासत्रांमुळे दर वेळी नवनवीन येणाऱ्या कायदे व नियमांबाबत माहिती मिळते, असे सर्व सभासदांनी आवर्जून सांगितले. सूत्रसंचालन सीए अनामय बापट यांनी केले. सीए सुमेध करमरकर यांनी आभार मानले.