(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील महावितरणच्या उपकेंद्र कार्यालयात कार्यरत असलेले यंत्रचालक (ऑपरेटर) रविंद्र रघुनाथ घाणेकर (४७) यांचे शुक्रवारी दुपारी ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेने महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
रविंद्र घाणेकर हे गेल्या दीड वर्षापासून देवरूख येथील महावितरण उपकेंद्रात यंत्रचालक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर हजर होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पाठीत अचानक दुखू लागले. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
ही बाब लक्षात येताच सहकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्यांना देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले.
घाणेकर हे रत्नागिरी तालुक्यातील देऊड गावचे मूळ रहिवासी होते. गेल्या १६ वर्षांपासून ते शासकीय सेवेत कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी साडवली येथील महावितरण कार्यालयात सुमारे साडेतीन वर्षे सेवा बजावली होती. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून ते देवरूख उपकेंद्रात कार्यरत होते.
शांत, प्रेमळ आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचारी म्हणून त्यांची सहकाऱ्यांमध्ये ओळख होती. ड्युटीवर असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
रविंद्र घाणेकर यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे.

