(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोंडये देऊळवाडी येथे बुधवारी रात्री बिबट्याच्या जबड्यातून शौर्याने सुटका करण्यात आलेल्या वानराची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. आज (गुरुवारी) दुपारी ते वानर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर भारतीय सैन्यातील जवान सुभाष येसणे, माजी सरपंच सुरेश दसम आणि ग्रामस्थांनी त्याला वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावण्याची तयारीही करण्यात आली होती. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच त्या निष्पाप प्राण्याची प्राणज्योत मालवली.
आज दुपारी माजी सरपंच सुरेश दसम परिसरातून जात असताना, बुधवारी रात्री ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला होता त्याच परिसरात वानर निपचित पडलेले दिसले. ते अजूनही जिवंत असावे, या आशेने त्यांनी तातडीने जवान सुभाष येसणे आणि गावातील तरुणांना पाचारण केले. जखमी वानरावर उपचार करण्यासाठी सर्वांनी तत्परता दाखवली, मात्र जवळ पोहोचल्यावर त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक माहितीनुसार, बिबट्याच्या तीक्ष्ण सुळे आणि पंज्यांमुळे झालेल्या गंभीर जखमा तसेच अतिरक्तस्रावामुळे वानराचा मृत्यू झाला.
वानराच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. “रानटी प्राणी असला तरी तोही एक सजीव आहे. त्यालाही वेदना होतात,” अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. या मुक्या प्राण्याबद्दलची संवेदनशीलता पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
लाल वस्त्रात लपेटून सन्मानपूर्वक दफन
माजी सरपंच सुरेश दसम यांनी वानरावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आणि जवान सुभाष येसणे यांनी मृत वानराला लाल वस्त्रात लपेटले. त्यानंतर निलेश मुंडेकर, संतोष दसम, सागर शितप, मधुकर दसम आणि सुभाष बाल्ये यांनी खड्डा खोदला. देशाचे रक्षण करणाऱ्या त्याच जवानाने स्वतःच्या हाताने त्या वानराला सन्मानपूर्वक दफन केले. बुधवारी रात्री बिबट्याच्या तावडीतून जीवदान देण्यासाठी धावलेला सैनिक आणि दुसऱ्याच दिवशी त्याच प्राण्याला अश्रुपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देतानाचे दृश्य उपस्थितांना भावूक करून गेले.
या घटनेनंतर कोंडये देऊळवाडी आणि मधली वाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मानवी वस्तीत शिरून छतावर चढत बिबट्याने शिकार केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पिंजरा लावावा, बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

