(देवरूख / सुरेश सप्रे)
सामान्य जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेत आपली कर्तव्ये जाणून विकासकामे करून आपली विश्वासार्हता सिध्द करा. जे काम करतील त्यांनाच पदे मिळतील. कारणे न सांगता जनतेत जावून जनतेचा विश्वास संपादन करा, असे परखड बोल खा. नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबाराचे लक्ष्मीनृसिंह कार्यालय देवरूख येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजापूरचे आम. किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, नुकतेच भाजपवासी झालेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, प्रशांत यादव, शिवसेनेचे नेते राजू महाडीक, रोहन बने. विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, प्रांत विश्वजीत गोताडे, तहसिलदार अमृता साबळे आदी उपस्थित होते.
जनतेच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी या जनता दरबारचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारीवर्गाने जनतेच्या प्रश्नांकडे सकारात्मता दाखवून समस्या निर्माण न करता जनतेचे प्रश्न समजावून घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही खा. राणे यांनी सांगितले. या जनता दरबारात १००च्या वर नागरिकांनी आपली निवेदन सादर केली होती. यातील अनेक प्रश्न त्वरित सोडविण्याचे आदेश खा. राणे संबंधित अधिकारी यांना दिले.
पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले प्रश्न व कामे करुन घेताना जनतेच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपले प्रश्न येथे मांडणे योग्य नाही असे खडेबोल जनता दरबारात प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना सुनावले.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होईल की नाही असे प्रश्न उपस्थित करून चर्चाचर्वण करु नका. मित्र पक्ष आपले शत्रू नाहीयेत, हे कायम लक्षात ठेवा. जिल्हातील युतीचा निर्णय वरीष्ठ घेतील त्याची चिंता करू नका. येणाऱ्या निवडणुकीत कोणी राजकारण करणेचा प्रयत्न केला तर अशांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा इशाराही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिला.

