( पुणे / वृत्तसंस्था )
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात झालेल्या भीषण अपघाताचा CCTV VIDEO समोर आला आहे. या फुटेजमध्ये अपघाताच्या काही क्षणांपूर्वी बोगद्याच्या मार्गात वाहने उभी असल्याचे आणि त्यानंतर भरधाव फॉर्च्युनर कारचा मालवाहू टेम्पोला जोरदार धडक देण्याचा घटनाक्रम कैद झाला आहे. या अपघातात वाकड परिसरातील युवा नेतृत्व तुषार भूमकर यांचा मृत्यू झाला. CCTV फुटेज समोर आल्यानंतर बोगद्यात वाहने उभी करण्याच्या प्रकाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
समोर आलेल्या CCTV फुटेजनुसार, गुरुवारी रात्री सुमारे १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास तुषार भूमकर प्रवास करत असलेली काळ्या रंगाची फॉर्च्युनर बोगद्यात प्रवेश करते. याचवेळी बोगद्याच्या उजव्या बाजूच्या लेनमध्ये काही वाहने आधीपासून उभी असल्याचे दिसते. फॉर्च्युनरसमोर अचानक ही वाहने आल्याने चालकाला अडथळा निर्माण झाल्याचे फुटेजमध्ये दिसून येते. उभ्या वाहनांना चुकवण्यासाठी फॉर्च्युनरने अचानक लेन बदलल्याचे दिसते. त्याचवेळी मधल्या लेनमधून एक मालवाहू टेम्पो पुढे जात होता.
यानंतर फॉर्च्युनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे दिसते आणि फॉर्च्युनर थेट टेम्पोच्या मागील बाजूस जोरदार धडकते. धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनरच्या पुढील भागाचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. अपघाताची तीव्रता CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते.
तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू
या भीषण अपघातात फॉर्च्युनरमध्ये चालकाच्या शेजारी बसलेल्या तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील इतर प्रवासीही जखमी झाले असून, त्यापैकी एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आली. त्यानंतर बोगद्यातील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तुषार भूमकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
बोगद्यात वाहने का उभी होती?
प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बोगद्यात काही वाहने नियमबाह्य पद्धतीने उभी असल्याने वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. याचदरम्यान फॉर्च्युनर वेगाने पुढे येत होती. उभ्या वाहनांमुळे निर्माण झालेला अडथळा, अचानक लेन बदलणे आणि त्यानंतर टेम्पोला झालेली धडक हा घटनाक्रम CCTV फुटेजमध्ये दिसून येतो.
मात्र, अपघातामागे नेमके कोणते कारण होते, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. वाहनांचा वेग, बोगद्यात उभी असलेली वाहने, चालकाचे नियंत्रण, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य तांत्रिक कारणे यांचा तपास केला जात आहे.
‘मिसिंग लिंक’च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, या मार्गावर यापूर्वी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून आता बोगद्यात झालेल्या या भीषण अपघातामुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः बोगद्यासारख्या मर्यादित जागेच्या ठिकाणी वाहने अनधिकृतपणे किंवा बेजबाबदारपणे उभी राहिल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बोगद्यातील वाहन नियंत्रण, आपत्कालीन व्यवस्थापन, CCTV देखरेख आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाई अधिक प्रभावी करण्याची मागणी होत आहे.
तुषार भूमकर हे पिंपरी-चिंचवड मधील वाकड परिसरातील सक्रिय युवा नेतृत्व म्हणून परिचित होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा वावर होता. त्यांच्या पत्नीने नुकतीच काँग्रेसच्या तिकिटावर पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढवली होती.
भूमकर यांच्या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूने वाकड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघाताचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर बोगद्यामध्ये वाहने नेमकी कोणी आणि कोणत्या कारणासाठी उभी केली होती, याचा सखोल तपास करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून CCTV फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू असून, अपघातामागील नेमके कारण आणि बोगद्यात उभ्या असलेल्या वाहनांची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

