( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुखची सांस्कृतिक चळवळ आणि महसूल विभाग एकाच वेळी लीलया सांभाळणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असणारे, रुक्ष आकडेमोड, शासकीय फाईल्स आणि नियमांची चौकट अशा वातावरणातही आपल्यातील संवेदनशीलता आणि सांस्कृतिक ओढ जपत, सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देणारे देवरुखचे लाडके नायब तहसीलदार महेश उर्फ आप्पा आठल्ये हे तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेतून ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. आपल्या प्रामाणिक आणि कार्यतत्पर स्वभावाने त्यांनी महसूल विभागात स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.
शासकीय सेवेत असताना नायब तहसीलदार या जबाबदारीच्या पदावर काम करताना आप्पा आठल्ये यांनी नेहमीच सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवले. देवरुख तहसील कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपुलकीने मदत करणे आणि कामात पारदर्शकता ठेवणे ही त्यांची ओळख राहिली. ३४ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक आव्हानात्मक कामे केली, मात्र आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही.
केवळ ‘टेबल वर्क’ मध्ये न अडकता त्यांनी देवरुखच्या सांस्कृतिक चळवळीतही हिरहिरीने भाग घेतला. रुक्ष आकडेमोडीच्या व्यवहारातून वेळ काढत त्यांनी आपल्यातील सांस्कृतिक गुण जोपासले आणि स्थानिक कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन दिले.
‘असा माणूस महसूलमध्ये पुन्हा होणे नाही’
आप्पा आठल्ये यांच्या सेवानिवृत्तीमुळे महसूल विभागात एका अत्यंत प्रामाणिक आणि सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्याची पोकळी निर्माण झाली आहे. “आप्पांसारखा माणुसकी जपणारा अधिकारी महसूल विभागात पुन्हा होणे नाही,” अशा भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

