(देवळे / वार्ताहर)
देवळे हायस्कुल ते जंगलवाडी दरम्यानचा डांबरी रस्ता एक महिन्याच्या आतच उखडला आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सदर काम करणारे ठेकेदार आणि त्यांचे दर्जा तपासणारे अधिकारी यांच्या कामाची पद्धत अशीच राहिली, तर अशा रस्त्यांची नोंद लिम्का रेकॉर्ड बुकमध्ये करावी लागेल, असा आरोप देवळे परिसरातल्या ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केला आहे. हा रस्ताच निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
या रस्त्याचे काम अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर झाले, मात्र ते गुणवत्तेच्या दृष्टीने अत्यंत निकृष्ट झाले आहे. आता तर प्रवास करणाऱ्या लोकांना म्हणणे लागले आहे की, आधीचा रस्ता तरी चांगला होता! एका महिन्यात तयार झालेल्या रस्त्याची अशी दुर्दशा होऊ शकते, तर पाच वर्षे हे रस्ते कसे टिकणार? या मुद्द्यावर संतप्त झालेल्या स्थानिकांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित या निकृष्ट कामाची पहाणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.