(रत्नागिरी / प्रतिनिधी)
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांसाठी रत्नागिरी विभागाने उपलब्ध करून दिलेल्या जादा बससेवेला यंदा चांगला प्रतिसाद मिळाला. विभागातून तब्बल ६० जादा बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात आल्या. या बसच्या २१२ फेऱ्यांमधून ४० हजारांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या यात्रेतून रत्नागिरी विभागाच्या एसटीच्या तिजोरीत ४८ लाख ४९ हजार रुपयांचे उत्पन्न जमा झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात तब्बल १२ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
दरवर्षी आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र आषाढीपेक्षा कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या तुलनेने अधिक असते. असे असतानाही यंदा आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने जादा बससेवेचे नियोजन केले होते. त्याला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी विभागातील विविध आगारांतून पंढरपूरसाठी ६० बसेस रवाना करण्यात आल्या. पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर या बसेसपैकी काही बसेस स्थानिक मार्गांवरही प्रवाशांच्या सेवेत धावल्या. त्यामुळे जादा बससेवेच्या एकूण २१२ फेऱ्या झाल्या. या माध्यमातून ४० हजारांहून अधिक प्रवाशांनी एसटीचा प्रवास केला.
या सेवेतून सर्वाधिक उत्पन्न दापोली आगाराला ७ लाख ४० हजार रुपये मिळाले. तर खेड आगाराचे उत्पन्न १ लाख ६२ हजार रुपये राहिले. संपूर्ण रत्नागिरी विभागाला यंदा ४८ लाख ४९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी याच यात्रेतून विभागाला ३६ लाख ४९ हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे यंदा उत्पन्नात तब्बल १२ लाख रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.
सवलतींमुळे प्रवाशांचा एसटीकडे ओढा
एसटी महामंडळाकडून विविध प्रवर्गातील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे लालपरीला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. त्यातच पंढरपूरपर्यंत थेट बससेवा उपलब्ध करून दिल्याने वारकऱ्यांना प्रवासाची मोठी सोय झाली. रेल्वे अथवा अन्य खासगी वाहतुकीच्या तुलनेत थेट एसटी बससेवेचा पर्याय उपलब्ध झाल्याने अनेक भाविकांनी लालपरीला पसंती दिली. आषाढी यात्रेच्या निमित्ताने रत्नागिरी विभागाने केलेल्या नियोजनामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुलभ झाला आणि त्याचवेळी एसटीच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे यंदाच्या पंढरपूर यात्रेत ‘विठुराया पावला’ अशीच चर्चा एसटी प्रशासनात रंगली आहे.

