(रत्नागिरी / वार्ताहर)
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने आगरनरळ प्रकर्ष लोकसेवा फाऊंडेशन (APL Foundation) (रजि.) यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, आगरनरळ नं. १ येथील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाला दर्जेदार वाचन साहित्य भेट देण्यात आले.
गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्याबरोबरच त्यांच्या कल्पनाशक्ती, आकलनशक्ती आणि ज्ञानवृद्धीस हातभार लागणार आहे.
या उपक्रमावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर लवंदे, उपाध्यक्ष अक्षय मेस्त्री, सचिव प्रज्योत जाधव, खजिनदार सिद्धेश लवंदे, सदस्य अक्षय लवंदे तसेच कांदळवन व्यवस्थापन समितीचे प्रकल्प समन्वयक सुरज वारंग उपस्थित होते.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदेश महाकाळ, केंद्रप्रमुख पांडुरंग शेजाळ, मुख्याध्यापक समीर मांडवकर तसेच शिक्षिका चारभे मॅडम आणि जंगले मॅडम यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी फाऊंडेशनने केलेले हे पुस्तकदान अत्यंत स्तुत्य व प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचन साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
या ज्ञानभेटीबद्दल शाळेच्या वतीने फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानण्यात आले. शिक्षण क्षेत्रासाठी योगदान देतानाच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणाऱ्या फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
‘पुस्तक हेच खरे ज्ञानाचे दार आहे आणि ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे,’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला आहे. फाऊंडेशनच्या या समाजोपयोगी कार्याचे कौतुक होत असून, भविष्यातही अशाच प्रकारचे शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सुरू राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

