(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरात नऊ गुंठे जमिनीचे बनावट दस्तऐवज तयार करून त्यावरून खरेदीखत नोंदवून तब्बल १२ लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप एका व्यक्तीवर करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोटे दस्तऐवज तयार केल्याचा संशय मनोज लक्ष्मण जाधव (रा. फ्लॅट क्र. ए-४, ए विंग, आकार अमृतवेल, नाचणे रोड, रत्नागिरी) याच्यावर आहे. ही घटना ११ डिसेंबर २०२३ ते १६ ऑगस्ट २०२४ दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालय, रत्नागिरी येथे घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसोप (ता. रत्नागिरी) येथील सर्व्हे क्र. १३७/१६ मधील नऊ गुंठे जमिनीवर प्रसाद सुमंत साळवी, सुहासिनी साळवी आणि स्मिता साळवी यांचा मुखत्यारी हक्क असताना, संशयित जाधव यांनी त्याच सर्व्हे नंबरची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे. या बनावट दस्तऐवजांच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचे खरेदीखत नोंदवण्यात आले.
जमिनीचा व्यवहार करून देण्याच्या नावाखाली संशयिताने फिर्यादी राजेश हनुमंत कांदळकर (वय ५८, रा. कुर्ला टर्मिनसजवळ, अमेय सीएचएस, नवीन टिळकनगर, चेंबूर, मुंबई) यांच्याकडून तब्बल १२ लाख रुपये घेतल्याची माहिती फिर्यादींनी पोलिसांना दिली. फिर्यादींच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात खोटे दस्तऐवज तयार करणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलिसांनी हाती घेतला असून, या व्यवहारातील इतर बाबींचीही चौकशी सुरू आहे.

