(चिपळूण / रत्नागिरी)
बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयासाठी खरेदी केलेल्या डिझेलमधील ७३ लिटर डिझेल मालकाच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचा आरोप कार्यालयातील मॅनेजरवर करण्यात आला आहे. चिपळूण येथील धवल व्यापारी संकुलात ४ ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात संबंधित मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वीरधवल सिताराम घाग (वय ७२, संचालक, साधना बिल्डर्स प्रा. लि., रा. धवल व्यापारी संकुल, खेड, चिपळूण) यांच्या मालकीच्या कार्यालयात गोपाळ रामलु डोबाली हा मॅनेजर म्हणून काम करत होता. साधना बिल्डर्सच्या नावाने एकूण १७३ लिटर डिझेल खरेदी करण्यात आले होते. त्यापैकी ७३ लिटर डिझेल फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान धवल व्यापारी संकुलातील साधना बिल्डर्सच्या कार्यालयात ही घटना घडल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. चोरीस गेलेल्या डिझेलची किंमत ७ हजार २२७ रुपये असून, ते तीन कॅनमध्ये ठेवण्यात आले होते, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.
या प्रकरणी वीरधवल घाग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोपाळ रामलु डोबाली (रा. ऑलिव्ह कॉम्प्लेक्स, काल्हेर, भिवंडी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


