(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील नेतृत्व करणाऱ्या महिलांसाठी चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांनी विधवा व एकल महिलांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देतानाच व्ही. बी. जी. राम जी अर्थात मनरेगा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सावंत यांनी ‘शिवीमुक्त समाज अभियान’ आजच्या काळात का गरजेचे आहे, याबाबत उपस्थित महिलांशी संवाद साधला. “समाजात कोणीही एकमेकांना शिव्या देऊ नयेत, असे तुम्हाला वाटते का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित महिलांना विचारला. त्यावर सर्व महिलांनी एकमुखाने सकारात्मक प्रतिसाद देत शिवीमुक्त समाजासाठी प्रयत्न करण्याची भूमिका व्यक्त केली.
व्ही. बी. जी. राम जी (मनरेगा) योजनेची माहिती देताना सावंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेसाठी बिनखर्चिक भागीदार संस्था म्हणून चक्रभेदी सोशल फाउंडेशनची निवड झाल्याची आठवण करून दिली. कोणत्याही प्रकारचा बाह्य निधी उपलब्ध नसतानाही केवळ समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
“समाजातील नागरिकांनी सहकार्य केले, तर भविष्यात आणखी चांगले आणि व्यापक काम करता येईल,” असे आवाहनही वैदेही सावंत यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित काही महिलांनी विधवा महिलांसाठी तसेच व्ही. बी. जी. राम जी (मनरेगा) योजनेअंतर्गत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, निवळी सरपंच तन्वी कोकजे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा गावडे, जिल्हा परिषद सदस्य माधवी गिते, पंचायत समिती सदस्य अनुष्का खेडेकर, पंचायत समिती सदस्य पूर्वा दळवी, शिरगावच्या साक्षी कुमठेकर, मिरजोळे येथील शुभांगी पंडये यांच्यासह सुमारे ३० महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

