(रत्नागिरी/ वार्ताहर)
रत्नागिरी शहरालगतच्या कुवारबाव साईनगर परिसरात एका २५ वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (२१ मे) रात्री घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून हत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मृत तरुणाचे नाव सूरज राजाराम झोरे (वय २५, मूळ रा. नायरी-संगमेश्वर, सध्या रा. विरार, मुंबई) असे आहे. कुवारबाव येथील साईनगर परिसरातील सात बंगल्याच्या मागील भागात रात्री ९.३० ते ११ च्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली.
तिघांकडून कोयत्याने हल्ला
प्राथमिक माहितीनुसार, सूरज झोरे हा काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. यावेळी संशयितांनी त्याला गाठून जुन्या वादातून किंवा अन्य कारणातून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हल्ल्यात सूरजच्या मानेवर आणि हातांवर गंभीर जखमा झाल्या.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेल्या अवस्थेत सूरजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
बहिणीची पोलिसांत तक्रार
या प्रकरणी मृत सूरजची बहीण नंदा रमेश फाले (रा. दहिसर, मुंबई) यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयित तिघांनी मिळून सूरजवर जीवघेणा हल्ला केला.
तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी शहर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड, नजीबूल शेख ऊर्फ सोनू यांचा समावेश आहे. संशयितांचे पूर्ण पत्ते अद्याप समोर आलेले नाहीत.
खुनामागे जुना वाद की अमली पदार्थ कनेक्शन?
या हत्येमागे नेमके कारण काय, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. जुना वाद, आर्थिक व्यवहार, अमली पदार्थांचे कनेक्शन किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे पुढील तपास करत आहेत.
या खुनामुळे रत्नागिरी शहर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

