(संगमेश्वर / प्रतिनिधी)
परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पंचकोश आधारित गुरुकुल विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आता आकाशवाणीची साथ मिळाली आहे. येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या क्रांती सप्ताहाच्या औचित्याने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ‘बाल जगत’ या कार्यक्रमासाठी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली पाच सामूहिक गीते ध्वनिमुद्रित करण्यात आली आहेत.
गुरुकुल विभागात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासासोबतच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जातो. कला, संगीत, खेळ, हस्तकला तसेच विविध कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना गुरुकुलच्या अकरा तासांच्या नियोजनबद्ध वेळापत्रकात दिले जाते. या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने संधी उपलब्ध करून दिली जाते.
गेल्या शैक्षणिक वर्षात संस्थेच्या पुढाकाराने गुरुकुलमध्ये ‘कै. आप्पासाहेब दांडेकर संगीत कक्ष’ सुरू करण्यात आला. हार्मोनियम, तबला, पखवाज, ढोलकी, ढोलक, पायपेटी, सिंथेसायझर (इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड), क्लॅप बॉक्स आणि बासरी अशा विविध वाद्यांनी सुसज्ज असलेल्या या संगीत कक्षात विद्यार्थ्यांना नियमितपणे गायन आणि वाद्यवादनाचे मार्गदर्शन केले जाते.
या मार्गदर्शनातून संगीताची विशेष आवड असलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र ‘गीत मंच’ तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक तसेच सामूहिक गायन आणि वादनाचा अनुभव मिळावा, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सातत्याने मिळणाऱ्या संधी आणि अनुभवांमुळे गीत मंचातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुमारे २५ ते ३० गाणी उत्तम प्रकारे सादर करण्याची क्षमता विकसित झाली आहे.
देशभक्तीपर गीते, स्फूर्तीगीते आणि समूहगीते यांसोबतच भजन, अभंग आणि पोवाडा यांसारखे लोकसंगीतही विद्यार्थी प्रभावीपणे सादर करतात. त्यांच्या या कलागुणांची दखल घेत रत्नागिरी आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांना ध्वनिमुद्रणाची अभिनव संधी मिळाली.
ध्वनिमुद्रणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी रत्नागिरी आकाशवाणी केंद्राला क्षेत्रभेट दिली. यावेळी आकाशवाणी केंद्रावर होणारे विविध कार्यक्रम, उपक्रम, विविध विभाग तसेच तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. त्यामुळे रेडिओची समृद्ध परंपरा आणि प्रसारमाध्यमाचे कार्य विद्यार्थ्यांना जवळून समजून घेता आले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आकाशवाणीवर ध्वनिमुद्रित करण्यात आलेली पाचही गीते गुरुकुलमध्येच तयार झालेली आहेत. या गीतांची शब्दरचना, गीतरचना, चाल, संगीत आणि संगीत संयोजनाची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सहभागाने आणि त्यांच्या समक्ष करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ गाणी सादर करण्याचीच नव्हे, तर सांगीतिक नवनिर्मितीची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचीही संधी मिळाली.
गुरुकुलमध्ये तयार झालेली ही गाणी आकाशवाणीसारख्या प्रदीर्घ परंपरा असलेल्या आणि व्यापक श्रोत्यांपर्यंत पोहोचणाऱ्या माध्यमातून ध्वनिमुद्रित होत असल्याचा विशेष अभिमान गुरुकुल परिवाराने व्यक्त केला आहे.
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची ही गाणी येत्या रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावरून ‘बाल जगत’ या कार्यक्रमात ऐकता येणार आहेत. हा कार्यक्रम आवर्जून ऐकावा, असे आवाहन गुरुकुल विभागातर्फे करण्यात आले आहे.

