(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यात मिथेनॉल मिश्रित दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून रत्नागिरी जिल्ह्यातही बेकायदेशीर मद्यनिर्मितीविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील कळवंडे परिसरातील जंगल भागात सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नंदेश सदाशिव वरपे (रा. वरपेवाडी, कळवंडे, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवंडे येथील धरणालगतच्या जंगलमय परिसरात बेकायदेशीररीत्या हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंाळकर आणि कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
निरीक्षक सुनील आरडेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हर्षद शेख तसेच जवान शुभम काडापुरे, मयूर पुरीबुवा आणि निखिल लोंढे यांच्या पथकाने जंगल परिसरात छापा टाकला असता तेथे गावठी दारू निर्मितीचा बेकायदेशीर अड्डा सुरू असल्याचे आढळून आले. या कारवाईत सुमारे ६ हजार लिटर रसायन, १०५ लिटर तयार गावठी दारू तसेच दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ९० हजार ९५० रुपये इतकी असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
पुण्यातील दुर्घटनेनंतर जिल्हाभर सुरू असलेल्या धाडसत्रामुळे हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांत सलग होत असलेल्या कारवायांमुळे बेकायदेशीर मद्यनिर्मितीच्या अड्ड्यांवर प्रशासनाने वचक निर्माण केल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा बेकायदेशीर मद्यनिर्मितीविरोधात कारवाईची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत.

