(रत्नागिरी / वार्ताहर)
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त इंडियन कोस्ट गार्ड, रत्नागिरी यांच्या वतीने भाट्ये समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. या अभियानात मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी सीमा मंच, रत्नागिरी आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव येथील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
झरी विनायक मंदिर, भाट्ये येथील किनारपट्टी परिसरात १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.१५ ते ९.१५ या वेळेत हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमादरम्यान किनाऱ्यावर विखुरलेला प्लास्टिक कचरा, बाटल्या, पिशव्या तसेच अन्य घनकचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
समुद्र, किनारपट्टी आणि सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी किनारपट्टी स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. समुद्रकिनाऱ्यावर साचणाऱ्या प्लास्टिकसह अन्य कचऱ्याचा सागरी जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि सागरी पर्यावरणाचे जतन करणे याबाबत जनजागृती करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाचे प्राचार्य आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. “किनारपट्टी स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” हा महत्त्वपूर्ण संदेश या अभियानातून देण्यात आला.


