(रत्नागिरी / प्रतिनिधी)
उन्हाळ्याच्या सुट्यांना सुरुवात होताच, कोकणचा रस्ता धरलेल्यांनी कोकण रेल्वेला अक्षरशः हाऊसफुल्ल केलं आहे. मुंबईसह शहरी भागांतून गावी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी केली असून, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्यांचे आरक्षण येत्या १७ मेपर्यंत पूर्णपणे भरले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
गावाकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जात असले तरी, यंदा उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत कमी असल्याने अनेकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे. परिणामी, एसटी स्थानकांबाहेरही प्रवाशांच्या रांगा वाढल्या आहेत. एसटी महामंडळाने ११४ ज्यादा गाड्या सुरू करून काहीसा दिलासा दिला असला, तरी तोही अपुरा ठरत आहे.
गर्दी आणि गोंधळाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असून, आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांनी खासगी ट्रॅव्हल्सकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, गरजेचा गैरफायदा घेत काही खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी भाड्यांचे दर गगनाला भिडवले आहेत. ७०० रुपयांच्या प्रवासासाठी १,००० ते १,५०० रुपये आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वे आणि एसटी प्रशासनाने वेळेत जादा गाड्यांची संख्या न वाढवल्याने प्रवाशांना या प्रकारचा फटका बसत आहे. काही चाकरमानी स्वतःच्या वाहनाने कोकण गाठू लागले असून, मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रस्त्यावरील वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली आहे.
कोकणच्या दिशेने सुरू असलेल्या या चाकरमान्यांच्या लोंढ्यामुळे सर्व प्रवासी सेवा यंत्रणांची कसोटी लागली आहे. वाढत्या गर्दीकडे पाहता, रेल्वे आणि एसटी प्रशासनाने तत्काळ अतिरिक्त सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.