(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या रत्नागिरीत लवकरच एक भव्य आध्यात्मिक सोहळा संपन्न होणार आहे. जागतिक शांततेचा संदेश देणारे आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे आज (२२ जानेवारी) रोजी रत्नागिरीत आगमन होत आहे. या निमित्ताने शहरातील गोगटे–जोगळेकर महाविद्यालयाच्या विस्तीर्ण क्रीडांगणावर सायंकाळी ६ वाजता भक्तीचा महासत्संग आयोजित करण्यात आला आहे.
धकाधकीच्या आणि ताणतणावपूर्ण जीवनात मन शांत, आनंदी आणि संतुलित ठेवण्याचा संदेश गुरुदेवांनी जगाला दिला आहे. डिजिटल युगात मानसिक अस्वस्थता वाढत असताना, मनापासून हसणे आणि वर्तमान क्षणात जगणे किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या मार्गदर्शनातून अनुभवता येणार आहे. सुदर्शन क्रिया, ध्यान आणि प्राणायामाच्या माध्यमातून श्वास, मन, भावना आणि शरीर यांचा सखोल संबंध उलगडून दाखवला जातो.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या विविध अभ्यासक्रमांद्वारे मन अधिक शांत, एकाग्र आणि सकारात्मक बनवण्याचे प्रभावी तंत्र शिकवले जाते. श्वासावर आधारित सहज, नैसर्गिक आणि परिणामकारक सुदर्शन क्रिया व ध्यानामुळे आरोग्याबरोबरच संपूर्ण जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतो, असा अनुभव कोट्यवधी साधकांनी घेतला आहे.
गेल्या अनेक दशकांपासून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी योग, ध्यान आणि प्राणायाम या भारतीय परंपरांचा जागतिक स्तरावर प्रचार केला आहे. त्यांच्या कार्यामुळे १८० हून अधिक देशांतील कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात आनंद आणि शांतता आली आहे. अध्यात्माबरोबरच जागतिक शांततेसाठी त्यांनी विविध संघर्षग्रस्त भागांत महत्त्वाची भूमिका बजावली असून, राममंदिरासारख्या संवेदनशील विषयांतही त्यांनी संवादाची दिशा दिली आहे.
रत्नागिरीसारख्या निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध भूमीवर गुरुदेवांचे आगमन होत असल्याने जिल्हाभरात उत्साहाचे वातावरण आहे. हा भक्ती उत्सव केवळ व्याख्यानापुरता मर्यादित न राहता, ज्ञान, ध्यान आणि सुश्राव्य भजन-सत्संगाचा अनोखा संगम ठरणार आहे. गुरुदेवांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सामूहिक ध्यान करण्याची संधी रत्नागिरीकरांसाठी खास अनुभव ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीम जोरदार तयारी करत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली आणि सातारा येथून सुमारे १५ ते २० हजार नागरिक या महासत्संगासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

