(दापोली / वार्ताहर)
मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उत्तर रत्नागिरी विभागीय फेरीत दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजने दमदार कामगिरी करत तब्बल ११ पारितोषिके पटकावली. लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे बुधवार, ५ ऑगस्ट रोजी ही विभागीय फेरी उत्साहात पार पडली.
दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साहित्य, ललित कला आणि संगीत विभागात उल्लेखनीय यश मिळवत महाविद्यालयाचा दबदबा कायम राखला. विशेष म्हणजे साहित्य विभागातील सहाही स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवत ६ पैकी ६ यशाची नोंद केली.
साहित्य विभागात ६ पैकी ६ स्पर्धांमध्ये यश
साहित्य विभागात महाविद्यालयाने यंदाही आपली भक्कम कामगिरी कायम ठेवली. वक्तृत्व (गट अ) स्पर्धेत जान्हवी डोंगरे हिने प्रथम क्रमांक, तर वक्तृत्व (गट ब) स्पर्धेत साईश्वरी पाटणे हिने प्रथम क्रमांक मिळवला.
वादविवाद (गट अ) स्पर्धेत पार्थ सामल आणि जान्हवी डोंगरे या जोडीने तृतीय क्रमांक पटकावला. वादविवाद (गट ब) स्पर्धेत पार्थ सामल आणि रासिका बर्वे या जोडीने द्वितीय क्रमांक मिळवला.
कथाकथन (गट अ) स्पर्धेत श्रुती येलवे हिने तृतीय, तर कथाकथन (गट ब) स्पर्धेत सफा ए. के. हिने द्वितीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या यशात भर घातली.
ललित कला विभागात सिद्धी मार्चंडे हिने व्यंगचित्र (Cartooning) स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. त्याचबरोबर स्थळचित्रकला (On the Spot Painting) स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत तिने दुहेरी यश संपादन केले.
संगीत विभागातही विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
संगीत विभागातही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा दाखवून दिली. तालवाद्य स्पर्धेत शार्दूल आठल्ये याने मकरंद सोमण यांच्या साथीने तृतीय क्रमांक मिळवला. पाश्चात्य वाद्य एकल स्पर्धेत आयुष मुलुख याने तृतीय क्रमांक पटकावला. तर भारतीय समूहगीत स्पर्धेत पार्थ गावडे, शार्दूल आठल्ये, कांचन आंबेकर, दिविज खेडेकर आणि ऋत्वी टिकेकर यांच्या संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या सादरीकरणासाठी आयुष मुलुख, वेदांत साठे, जय जाधव आणि मंथन मुलुख यांनी साथसंगत केली.
मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी विद्यार्थ्यांची तयारी
या स्पर्धेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, साहित्य विभाग समन्वयक प्रा. तेजस मेहता, नाट्य विभाग समन्वयक प्रा. अजिंक्य मुलुख, संगीत विभाग समन्वयक प्रा. अनिरुद्ध सुतार तसेच सांस्कृतिक विभाग सदस्य प्रा. विश्वेश जोशी, प्रा. जान्हवी दिवेकर, प्रा. स्वाती देपोलकर आणि प्रा. सिद्धी साळगावकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, संचालक श्री. रविंद्र कालेकर आणि प्राचार्य डॉ. घनशाम साठे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले. आगामी मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

