(दापोली)
दापोली तालुका पंचायत समिती मार्फत जि.प.शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी सन २०१८ पासून सुरु असलेला स्वप्नवत उपक्रम ‘व्हिजन दापोली’ अंतर्गत नुकत्याच घेण्यात आलेल्या VDS-4 अर्थात पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर पूर्वतयारी म्हणून इ.चौथीमधील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज गटविकास अधिकारी, गणेश मंडलीक यांच्या हस्ते त्यांच्याच दालनात जाहीर करणेत आला.
एकूण ११२६ प्रविष्ठ पैकी ११०१ वाद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यातून फक्त ५१ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी करुन त्या विद्यार्थ्यांवर पुढील “पाचवी शिष्यवृत्ती” परीक्षेसाठी लक्ष्य केंद्रीत करुन, व्हिजन दापोली अंतर्गत सराव परीक्षा, मार्गदर्शन कार्यशाळा आदिंचे आयोजन करण्यात येणार असून, जाहीर झालेल्या निकालात ओळगाव शाळेची अन्वी मित मांजरेकर हिने २६० गुण मिळवित तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला; तर अडखळ कदमवाडी शाळेतील आदिती शशिकांत शेळके हिने २४८ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, सातेरे तर्फ नातू शाळेतील रत्नेश राजेंद्र पेडणेकर याने २४२ तृतीय आणि स्वरा महेश पाथ्रटकर, देगाव शाळा व वरदा संदीप देशपांडे, अंजर्ले नं.१ शाळा या दोघांनी २४० गुण मिळवुन अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक प्राप्त केला.
गुणवत्ता यादीतील पहिल्या दहा विद्यार्थ्यांचा गटविकासअधिकारी गणेश मंडलीक,नुतन गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, विस्तार अधिकारी बळिराम राठोड,नजीर वलेले आणि मेघा पवार आदि. मान्यवरांचेहस्ते प्रशस्तीपत्र,व भेटवस्तू देऊन सन्मान करणेत आला. याप्रसंगी शासकीय परिक्षेसारखेच vds4 परीक्षेचे आयोजन तालुक्यात पहायला मिळाले. मुख्य समितीसह विषय समिती मधील शिक्षक यासाठी वर्षभर प्रयत्न करतांना आपण पाहिले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षक,पालक देत असलेले योगदान स्तूत्य असल्याचे तसेच राष्ट्रविकासास आपले सर्वांचे बहुमोल योगदान लाभो अशा सदिच्छा व्यक्त करुन,सर्व यशस्वी मुलांचे गणेश मंडलीक यांनी अभिनंदन केले.;तर गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनीही सर्वांच्या सहकार्याने सुरु असलेली व्हिजन दापोली उपक्रमाची चालू असलेली यशस्वी वाटचाल जोमाने सुरु रहावी, गुणवत्तेचा वाढता आलेख असाच पुढे चालू ठेवूया आणि विद्यार्थी विकास साधूया असा आशावाद व्यक्त करत सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी गुणवत्ता यादीत ४था क्रमांक प्राप्त करणारी कु.स्वरा पाथ्रटकर हिने मनोगत व्यक्त करतांना व्हिजन दापोलीमुळे आम्हास एक व्यासपीठ मिळाले, आणि सर्व गुरुजन,पालक, पर्यवेक्षकीय यंत्रणा यांचेमुळे आपणास यश मिळाल्याचे तिने सांगितले. प्रास्ताविक व निकाल वाचन केंद्रप्रमुख सुनिल कारखेले यांनी तर आभार प्रदर्शन संजय मेहता यांनी केले. यावेळी व्हिजन मुख्य समिती मधील सर्व सदस्य, पालक,सहाय्यक गटविकास अधिकारी, गटविकास अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, पालक तसेच मार्गदर्शक शिक्षक,बी.आर.सी.मधील सर्व विषय तज्ञ उपस्थित होते.