( दापोली / वार्ताहर )
दापोली तालुक्यातील अडखळ बौद्धवाडी परिसरात डंपर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला नरम मातीत डंपरचे चाक रुतल्याने ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना डंपर अचानक उलटला. या दुर्घटनेत चालक डंपरखाली अडकून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मृत चालकाचे नाव नवनीत नरेश भिसे (वय ३०, रा. केळशी, ता. दापोली) असे आहे. हा अपघात गुरुवारी, ६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अडखळ बौद्धवाडी परिसरात घडला.
रस्त्याच्या कडेला डंपर मातीत रुतला
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनीत भिसे हे MH 08 AP 6668 क्रमांकाचा रिकामा आयशर डंपर घेऊन केळशीच्या दिशेने जात होते. खडी खाली करून ते केळशी येथे परतत असताना अडखळ बौद्धवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या नरम मातीमुळे डंपरचे चाक मातीत रुतले. डंपर बाहेर कसा काढता येईल, याचा प्रयत्न करण्यासाठी चालक नवनीत भिसे वाहनातून खाली उतरले. त्याचवेळी मातीत रुतलेला डंपर अचानक उजव्या बाजूला उलटला. या दुर्घटनेत नवनीत भिसे डंपरखाली अडकून चिरडले गेले.
जेसीबीच्या मदतीने चालकाला बाहेर काढले
घटना लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या ज्ञानदेव चुनेकर यांनी डंपरचे मालक मिथुन प्रकाश चिंचघरकर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर क्लिनरलाही तातडीने घटनास्थळी बोलावण्यात आले. डंपरखाली अडकलेल्या नवनीत भिसे यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. डंपर बाजूला केल्यानंतर चालकाला बाहेर काढून रुग्णवाहिकेतून दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित
नवनीत भिसे यांना पहाटे सुमारे ४.३० वाजता दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संतोष सडकर करीत आहेत.

