(मुंबई / वृत्तसंस्था)
‘ढाक्कूमाक्कूम…’च्या तालावर दहीहंडीच्या थरारात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. २०२६ च्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. मानवी मनोरे रचताना अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपयांपर्यंतची विमा भरपाई मिळणार आहे. तसेच अपघातानंतर रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्यास १ लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च विमा योजनेतून दिला जाणार आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय क्रीडा विभागाने जारी केला आहे. दहीहंडी उत्सवातील मानवी मनोरे उभारण्याच्या खेळाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यात आला आहे. उत्सवादरम्यान अपघातग्रस्त होणाऱ्या गोविंदांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
गेल्या वर्षीपेक्षा १० हजार गोविंद वाढले
दहीहंडी उत्सवाची वाढती लोकप्रियता आणि सहभागी गोविंदांची संख्या लक्षात घेऊन यंदा विमा संरक्षणाचा विस्तार करण्यात आला आहे. २०२५ मध्ये १ लाख ५० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते. यंदा ही संख्या १० हजारांनी वाढवून १ लाख ६० हजार करण्यात आली आहे. गोविंदांचा विमा उतरविण्यासाठी विमा कंपनीची निवड करण्याची जबाबदारी क्रीडा व युवक सेवा आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
मृत्यू किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख
शासन निर्णयानुसार, दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचताना गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच दोन्ही अवयव किंवा दोन्ही डोळे गमावल्यासही १० लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये देण्यात येणार आहेत. कायमस्वरूपी अंशतः अपंगत्वाच्या प्रकरणात विमा पॉलिसीमध्ये निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार भरपाई दिली जाईल.
उपचारासाठी १ लाख रुपयांपर्यंत मदत
मानवी मनोरे रचताना अपघात होऊन गोविंदाला रुग्णालयात दाखल करावे लागल्यास प्रत्यक्ष झालेला रुग्णालयीन खर्च किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपयांपर्यंतचा खर्च विमा योजनेतून देण्यात येणार आहे. मात्र, मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणामुळे झालेल्या अपघाताला या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
गोविंदांची नोंदणी आणि वयाची पडताळणी बंधनकारक
विमा संरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी पात्र गोविंदांची नोंदणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य गोविंदा असोसिएशनकडे सराव आणि प्रशिक्षण घेणाऱ्या तसेच निर्धारित वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या आणि प्रत्यक्ष दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांची नोंदणी केली जाणार आहे. नोंदणी केलेल्या गोविंदांची माहिती आणि वयाची पडताळणी करून ती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे सादर केली जाणार आहे. नोंदणीकृत गोविंदांच्या संख्येनुसार विमा हप्त्याची रक्कम अदा केली जाणार आहे.
आयोजकांवर गोविंदांच्या सुरक्षेची जबाबदारी
दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या संस्थांना स्थानिक प्रशासन आणि संबंधित प्राधिकरणांकडून आवश्यक परवानग्या घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. न्यायालय, शासन, स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सुरक्षा सूचनांचे पालन करणे आयोजकांना आवश्यक आहे. दहीहंडीमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी आयोजकांवर राहणार आहे. अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही आयोजकांची असेल.
गोविंदांसाठी विमा संरक्षण किती?
- अपघाती मृत्यू: १० लाख रुपये
- दोन्ही अवयव किंवा दोन्ही डोळे गमावल्यास: १० लाख रुपये
- एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास: ५ लाख रुपये
- कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व: १० लाख रुपये
- कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व: विमा पॉलिसीतील तरतुदीनुसार भरपाई
- रुग्णालयीन उपचार खर्च: प्रत्यक्ष खर्च किंवा कमाल १ लाख रुपये
- एकूण विमा संरक्षण मिळणारे गोविंदा: १ लाख ६० हजार

