( नवी दिल्ली )
भारतीय पासपोर्ट हा नागरिकत्वाचा निश्चित पुरावा नसून तो मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरला जाणारा अधिकृत दस्तऐवज आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर देशभरात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. या वक्तव्यानंतर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी नेमके कोणते कागदपत्र ग्राह्य धरले जाते, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
14 व्या पासपोर्ट सेवा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतीय पासपोर्ट जारी करण्यापूर्वी विविध स्तरांवर कागदपत्रांची पडताळणी आणि पोलीस सत्यापन केले जाते. मात्र, कायद्याच्या दृष्टीने पासपोर्ट हा प्रवासाचा दस्तऐवज आहे, नागरिकत्वाचे प्रमाणपत्र नाही.
अधिकाऱ्यांच्या मते, पासपोर्टचा मुख्य उद्देश भारतीय नागरिकांना परदेशात ओळख आणि प्रवासासाठी अधिकृत दस्तऐवज उपलब्ध करून देणे हा आहे. त्याचबरोबर सरकारने चिप-आधारित ई-पासपोर्टसह पासपोर्ट सेवांचे आधुनिकीकरण सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.
नागरिकत्वाचा पुरावा कोणता?
या स्पष्टीकरणानंतर नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रे वैध आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, भारतात जन्माने नागरिक असलेल्या व्यक्तीसाठी नागरिकत्व सिद्ध करणारे एकच सार्वत्रिक दस्तऐवज उपलब्ध नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट ही कागदपत्रे वेगवेगळ्या प्रशासकीय उद्देशांसाठी वापरली जातात. मात्र, ती स्वतंत्रपणे नागरिकत्वाचा अंतिम आणि निश्चित पुरावा मानली जात नाहीत.
पासपोर्ट कायदा काय सांगतो?
परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट कायदा, 1967 मधील कलम 20 चा उल्लेख केला आहे. या तरतुदीनुसार, सार्वजनिक हित लक्षात घेऊन केंद्र सरकार आवश्यक वाटल्यास भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीलाही पासपोर्ट किंवा प्रवासाचे दस्तऐवज जारी करू शकते. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही पासपोर्ट हा ओळख आणि प्रवासासाठीचा दस्तऐवज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत विशिष्ट परिस्थितीत बिगर-भारतीय नागरिकांनाही प्रवासासाठी पासपोर्ट जारी करण्याची तरतूद आहे.
आदित्य ठाकरेंचे सरकारला तीन सवाल
परराष्ट्र मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यांनी विचारलेले प्रमुख प्रश्न असे आहेत:
- पासपोर्ट नागरिकत्वाचा पुरावा नसेल, तर पोलीस पडताळणी नेमकी कशासाठी केली जाते?
- भारत परदेशी नागरिकांनाही पासपोर्ट जारी करतो का?
- या स्पष्टीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पासपोर्टबाबत संभ्रम निर्माण होणार नाही का?
आदित्य ठाकरे यांनी सरकारने या मुद्द्यावर अधिक स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

