(पुणे)
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कर्जमाफीबाबतचा महत्त्वाचा निर्णय पुढील एका महिन्यात घेतला जाणार असून, याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
पेरणीपूर्व कृषी आढावा बैठकीनंतर बोलताना भरणे यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. “एका महिन्यात अंतिम निर्णय होईल. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मागील काही महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
११ हजार ‘शेतकरी मित्र’ नियुक्तीचा निर्णय
शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘शेतकरी मित्र’ ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यभरात सुमारे ११ हजार शेतकरी मित्रांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हास्तरावर निवड प्रक्रिया पार पडणार असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ वेळेत मिळण्यास मदत होणार आहे.
एल-निनोचा धोका; खरीप हंगामासाठी सज्जता
दरम्यान, बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या एल-निनो परिस्थितीचा विचार करून कृषी विभागाने खरीप हंगामासाठी विशेष तयारी सुरू केली आहे. मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन नियोजनाचा आढावा घेतला आणि “अधिकाऱ्यांनी कार्यालयात न बसता थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करावे,” असे निर्देश दिले. तसेच, येत्या काळात चारा आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठीही आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

