(ठाणे)
नालासोपारा पश्चिममध्ये ५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ८ वर्षीय मुलाचा मृतदेह इमारतीच्या पाण्याच्या टाकीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत मुलाचे नाव मेहराज शेख (वय ८) असे असून तो टाकीपाडा परिसरातील करारी बाग इमारतीत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता. मेहराज हा नालासोपाराच्या सेंड गोंसालो गार्सिया सेमी इंग्लिश हायस्कूलमध्ये तिसरीच्या वर्गात शिकत होता.
घटना कशी घडली?
मेहराज ३ डिसेंबर रोजी शाळेतून घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी बाहेर गेला. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु तो न मिळाल्याने ४ डिसेंबर रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
सोमवारी सकाळी करारी बाग इमारतीच्या पाण्याच्या टाकीतून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीची तक्रार रहिवाशांनी केली. तत्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना बोलावण्यात आले. टाकीत शोध घेतल्यावर मेहराजचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला, आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक अंदाज : अपघाती मृत्यू?
ही पाण्याची टाकी उघडी होती, असा चौकशीतून समोर आले आहे. मेहराज खेळताना चुकून टाकीत पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज नालासोपारा पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून पाण्याच्या टाक्या खुल्या आणि असुरक्षित ठेवण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

