(सातारा)
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाचे पडसाद उमटत असताना साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची अखेर बदली करण्यात आली आहे. दोशी यांची सांगली येथे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून निखिल पिंगळे यांची साताऱ्याच्या नव्या एसपीपदी नेमणूक झाली आहे. अवघ्या ११ महिन्यांत झालेल्या या बदलामुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे.
झेडपी निवडणुकीतील राडा ठरला निर्णायक
२० मार्च रोजी झालेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला होता. सत्तास्थापनेसाठी आवश्यक बहुमत असतानाही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील समीकरणे बिघडली. या पार्श्वभूमीवर दोन राष्ट्रवादी सदस्यांना मतदानापासून रोखत त्यांना अटक केल्याचा आरोप झाला. दुसरीकडे, काही सदस्य फोडल्याच्या हालचालींमुळे सत्तांतर घडून भाजपाच्या ताब्यात झेडपी गेली.
मंत्र्यांशी झटापट; विधान परिषदेत पडसाद
निवडणुकीदरम्यान पोलीस आणि नेत्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीने वातावरण तापले. शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील खाली पडल्याची घटना घडली. या प्रकाराचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले. त्यानंतर काही काळ दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपकडून पोलिसी बळाचा वापर करुन सत्ता हस्तगत करण्यात आल्याचे आरोप शिंदेंच्या शिवसेनेने आरोप केले होते. या घटनेविरोधात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. सभागृहात शिवसेनेने रणनीती ठरवत सातारा पोलीस अधीक्षकांना या सगळ्या गोंधळानंतर निलंबनाची निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिले होते. त्यावर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सगळा प्रकार मांडला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आले होते.
वादग्रस्त कार्यकाळ आणि आधीचे आरोप
तुषार दोशी यांच्या कार्यकाळात अनेक वादग्रस्त घटना घडल्या. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणीही त्यांच्यावर टीका झाली होती. तसेच, आंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज प्रकरणामुळे ते आधीच चर्चेत होते. या सर्व घटनांमुळे त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक दबाव वाढत गेला.
मूळचे महाड (रायगड) येथील तुषार दोशी यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेतले. २००० साली पोलीस उपाधीक्षक म्हणून सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी चंद्रपूर, लातूर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई, जालना आणि सातारा येथे विविध पदांवर काम केले. २०१४ मध्ये त्यांना पोलीस अधीक्षकपदी बढती मिळाली. झेडपीतील राड्यानंतर वाढलेला राजकीय तणाव, मंत्र्यांशी झालेली झटापट आणि प्रशासनावरील टीका यामुळे ही बदली करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गृहमंत्रालयाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
9 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
- सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची सांगली येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली
- पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली
- सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपआयुक्त (सुरक्षा) म्हणून नियुक्ती
- कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक (अतिरिक्त जबाबदारी) म्हणून नियुक्ती
- गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर येथे अधीक्षक म्हणून बदली
- एम. रमेश यांना गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती
- महेश्वर रेड्डी यांची जळगाववरून पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली
- श्रीकांत धिवरे यांची धुळेवरून जळगाव येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती
- राजकुमार शिंदे यांना पुणे येथून वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली

