(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी दिलासा देणारी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जगातील अत्यंत महत्त्वाच्या आणि मोक्याच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुज सामुद्रधुनीतून ६० मोठी व्यापारी जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली असून ती भारतात सुखरूप पोहोचली आहेत. यासोबतच आखाती प्रदेशातून ३,९७२ भारतीय खलाशांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.
संसदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने होर्मुज सामुद्रधुनी आणि आखाती प्रदेशातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. संघर्षजन्य परिस्थितीत भारतीय नागरिक आणि सागरी वाहतुकीच्या सुरक्षेला प्राधान्य देत विशेष संकट व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.
६० व्यापारी जहाजे भारतात सुरक्षित
सरकारच्या माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनीतून ६० व्यापारी जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली असून ती भारतात पोहोचली आहेत. या जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी जहाजांवरील खलाशांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले होते. होर्मुज सामुद्रधुनीतून होणाऱ्या सागरी प्रवासासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली होती. त्यामुळे भारतीय खलाशांवर धोकादायक कामे करण्यासाठी अनावश्यक दबाव येऊ नये, याची काळजी घेण्यात आली.
३,९७२ भारतीय खलाशांना मायदेशी आणले
आखाती प्रदेशातील संघर्षजन्य परिस्थितीत आतापर्यंत ३,९७२ भारतीय खलाशांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात आले आहे. संघर्षग्रस्त भागात कर्मचारी बदलाची प्रक्रिया केवळ संबंधित खलाशाच्या संमतीने आणि आपत्कालीन परिस्थितीतच करण्यास परवानगी देण्यात आली होती. भारतीय खलाशांच्या स्थलांतर आणि मायदेशी परत आणण्याच्या प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी २४ तास कार्यरत नियंत्रण कक्ष आणि नौवहन महासंचालनालयाचे सागरी क्षेत्र जागरूकता केंद्र कार्यरत ठेवण्यात आले होते.
हजारो फोन कॉल्स आणि ईमेल्सवर तातडीने कार्यवाही
संकट व्यवस्थापनासाठी सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या संपर्क विनंत्या हाताळल्या. सरकारच्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाने आतापर्यंत १५,७७१ फोन कॉल्स आणि ३६,४९९ ईमेल्स हाताळले आहेत. या माध्यमातून खलाशी, त्यांचे कुटुंबीय तसेच सागरी क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आवश्यक माहिती आणि मदत उपलब्ध करून देण्यात आली. भारतीय खलाशांची नियुक्ती परवानाधारक भरती आणि नियुक्ती सेवा एजन्सीमार्फत केली जाते. संबंधित नियामक मंजुरी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही खलाशाला इमिग्रेशन क्लिअरन्स मिळू शकत नाही, असेही सरकारने स्पष्ट केले.
देशात LPG चा तुटवडा नाही
दरम्यान, होर्मुज सामुद्रधुनीतील तणावामुळे भारतातील LPG पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना सरकारने देशात LPG चा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. होर्मुज सामुद्रधुनी हा जगातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. आखाती प्रदेशातील संकटाच्या काळात शिवालिक, नंदा देवी, लाडकी, पाइन गॅस, जग वसंत, बीडब्ल्यूडी टेल, बीडब्ल्यूईएलएम आणि ग्रीन सान्वी या जहाजांना भारतात आणण्यात आले.
या जहाजांद्वारे LPG चा पुरवठा कायम ठेवण्यास मदत झाली असून, त्यामुळे देशातील LPG उपलब्धता आणि पुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यास हातभार लागला आहे.

