(नांदेड / वृत्तसंस्था)
मराठवाड्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड धबधब्याचा आनंद घेऊन महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपचा भीषण अपघात झाला. तोटंबा जंगल घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळली. या दुर्घटनेत चार जण ठार झाले असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी, दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला.
तुम सायलू (६०), तुम गौरा बाई (६०) आणि आवला गंगाधर (५५) (सर्व रा. पार्डी, ता. कुबेर, जि. निर्मल, तेलंगणा) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची नावे समोर आली आहेत. एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील कुबेर मंडळांतर्गत येणाऱ्या पार्डी येथील १० ते १२ भाविक सोमवारी एपी २५ एएच ६७४७ क्रमांकाच्या कमांडर जीपने नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड येथे आले होते. धबधब्याचे मनमोहक रूप पाहिल्यानंतर आणि येथील श्री महादेव मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास सर्वजण जीपने आपल्या गावाकडे परत निघाले होते.
भाविकांची जीप सीमावर्ती भागातील तोटंबा गावाजवळील जंगल घाटात आली असता भरधाव वेगातील जीपवरील चालकाचा अचानक ताबा सुटला. त्यामुळे नियंत्रणाबाहेर गेलेली जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन थेट आदळली.
अपघाताची तीव्रता एवढी होती की कमांडर जीपचा अक्षरशः चुराडा झाला. अपघाताचा मोठा आवाज होताच तोटंबा गाव परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी जीपमध्ये फसलेल्या जखमींना बाहेर काढून मदतकार्य सुरू केले.
अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील सर्व ७ गंभीर जखमींना प्रथमोपचार आणि पुढील तातडीच्या उपचारासाठी तेलंगणातील कुबेर मंडळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेमुळे पार्डी गावासह परिसरात शोककळा पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

