(मुंबई)
एसटी महामंडळाने आपली आर्थिक स्थिती सावरण्यासाठी आणि उत्पन्नाचे नवे मार्ग उघडण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फक्त एसटी बसेससाठी इंधनपुरवठा करणाऱ्या महामंडळाच्या डेपोमध्ये आता सर्वसामान्य नागरिकांनाही त्यांच्या खासगी वाहनांसाठी पेट्रोल आणि डिझेल भरण्याची सुविधा मिळणार आहे.
‘पेट्रो-मोटेल हब’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या उपक्रमाअंतर्गत, एसटी महामंडळाने केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांशी भागीदारी करत व्यावसायिक तत्वावर इंधन विक्री केंद्र (पंप) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे महामंडळाला केवळ तिकीट विक्रीवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर इंधन विक्री आणि इतर सेवांमधूनही महसूल मिळू शकतो.
सध्या एसटी महामंडळाकडे २५१ स्वतःच्या मालकीचे डेपो आहेत. या डेपोंमधून फक्त लालपरी अर्थात एसटी बसेसना डिझेल पुरवण्यात येत होते. मात्र, आता या ठिकाणी सर्वसामान्य वाहनचालकांनाही इंधन उपलब्ध होणार आहे. याचबरोबर, या इंधन पंपांच्या परिसरात दुकाने, कॅफे, आरामदायक बसण्याची व्यवस्था आणि अन्य सेवा-सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी थांबणाऱ्या प्रवाशांना अधिक सुसज्ज आणि चांगल्या सुविधा मिळणार आहेत.
महामंडळाचा हा निर्णय प्रवासी सेवांमध्ये सुधारणा, महसूल वाढ आणि स्थानिक रोजगार निर्मिती या तीन प्रमुख उद्दिष्टे साध्य करणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात चालणाऱ्या एसटी महामंडळासाठी हा प्रकल्प नव्या आशेचा किरण ठरणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या प्रमुख सार्वजनिक तेल कंपन्यांसोबत व्यावसायिक करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे करार केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पारदर्शक पद्धतीने होतील, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांनी दिली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठिकाणी असलेल्या डेपो परिसरांचे सर्वेक्षण केले जात आहे. विशेषतः महामार्गांलगत असलेल्या जागांवर हे इंधन पंप आणि सुविधा केंद्र उभारले जातील. नंतर, टप्प्याटप्प्याने ही योजना संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक स्तरावरही रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे.
महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच प्रवाशांना आरामदायक सुविधा आणि सोयीचा प्रवास मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास एसटी महामंडळ केवळ वाहतूक सेवा पुरवणारी संस्था न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर उपक्रम म्हणून उभा राहू शकेल.
महामंडळाच्या व्यवस्थापनाच्या मते, ‘पेट्रो-मोटेल हब’ हा उपक्रम एसटीच्या आर्थिक पुनरुज्जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. उत्पन्नवाढ, सेवा सुधारणा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा प्रकल्प भविष्यात इतर राज्यांसाठीही अनुकरणीय ठरू शकतो.

